गुडन्यूज! अग्निशमन विभागात नाेकरीची आली संधी, डिसेंबरपासून भरती सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 06:08 AM2022-11-10T06:08:45+5:302022-11-10T06:09:09+5:30
मुंबई अग्निशमन विभागातील ९१० पदे लवकरच भरली जाणार आहेत.
मुंबई :
आपत्कालीन परिस्थितीचा सामना करणाऱ्या मुंबई अग्निशमन दलात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असून, उपलब्ध जवानांच्या मदतीने अग्निशमन दलाचा गाडा हाकला जात आहे. रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर येणारा ताण लक्षात घेता ही पदे भरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे मुंबई अग्निशमन विभागातील ९१० पदे लवकरच भरली जाणार आहेत.
अग्निशमन दलात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची क्षमता ३,५०० असून, ९१० कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. याशिवाय चालकांची क्षमताही कमी असून, ५६ चालकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आली आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने महापालिकेने अग्निशमन विभागातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला असून, त्याबाबत निविदाही काढण्यात आली आहे.
डिसेंबरपासून ही भरती सुरू होईल. त्यानंतर उमेदवारांची निवड करण्यासाठी दोन महिने लागतील व त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागेल. २०२३च्या अखेरपर्यंत पूर्ण क्षमतेने अग्निशमन विभागाचे काम सुरळीतपणे चालेल, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.