असा होईल वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश, अखिल भारतीय स्तरावरील प्रवेशप्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 12:12 PM2022-09-25T12:12:33+5:302022-09-25T12:14:10+5:30
ॲलोपॅथी (एम.बी.बी.एस.) व दंतवैद्यकीय (बी.डी.एस.) अभ्यासक्रम वैद्यकीय अभ्यासक्रमांचे काही प्रवेश अखिल भारतीय स्तरावर दिले जातात.
आनंद मापुस्कर, करिअर मार्गदर्शक
ॲलोपॅथी (एम.बी.बी.एस.) व दंतवैद्यकीय (बी.डी.एस.) अभ्यासक्रम वैद्यकीय अभ्यासक्रमांचे काही प्रवेश अखिल भारतीय स्तरावर दिले जातात. यासाठी ‘डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस’द्वारे स्थापन केलेल्या ‘मेडिकल कौन्सिलिंग कमिटी’द्वारे खालील संस्थांतील वैद्यकीय व दंतवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता कौन्सिलिंग करण्यात येते.
- देशभरातील शासकीय, अनुदानित, पालिका संचालित वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील १५ टक्के जागा.
- अभिमत विद्यापीठातील सर्व जागा.
- केंद्रीय विद्यापीठांतील सर्व जागा.
- एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ESIC) द्वारा संचालित वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व जागा.
- आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे.
- दिल्ली विद्यापीठ.
- बनारस हिंदू विद्यापीठ.
- अलिगढ मुस्लीम विद्यापीठ.
- ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस.
- जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्यु. ॲण्ड रिसर्च.
www.mcc.nic.in ही वेबसाइट पाहावी. ज्यांनी ‘आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज’साठीचा पर्याय निवडला असेल त्यांची मेरिट लिस्ट एएफएमसीकडे पाठवली जाते. www.afmc.nic.in पाहावी.
भारतीय चिकित्सा पद्धती अभ्यासक्रम
आयुष मंत्रालयाद्वारे आयुष ॲडमिशन्स सेंट्रल कौन्सिलिंग कमिटीच्या वतीने आयुर्वेद, सिद्ध, युनानी, होमिओपॅथी या अभ्यासक्रमांच्या अखिल भारतीय स्तरावर भरल्या जाणाऱ्या जागांसाठी कौन्सिलिंग केले जाते. अधिक माहितीसाठी https://aaccc.gov.in/ ही वेबसाइट पाहावी.
महाराष्ट्रातील प्रवेशप्रक्रिया
- राज्यातील शासकीय, अनुदानित व महापालिकेच्या वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील ८५ टक्के जागा तसेच खासगी विनाअनुदानित महाविद्यालयातील सर्व जागांची प्रवेशप्रक्रिया ‘नीट’मधील राज्यस्तरीय गुणवत्तेनुसार होते. आयुर्वेद, सिद्ध, युनानी, होमिओपॅथी अभ्यासक्रमांचे प्रवेशही ‘नीट’च्या गुणवत्तेनुसार होतात. वेबसाइट- https://cetcell.mahacet.org/
- विनाअनुदानित (एमबीबीएस व बीडीएस) वैद्यकीय महाविद्यालयातील व्यवस्थापन कोटादेखील राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फतच भरला जातो.
- महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाचे (बॅचलर ऑफ व्हेटर्नरी सायन्स ॲण्ड ॲनिमल हसबंडरी) प्रवेश ‘नीट’च्या गुणवत्तेनुसार दिले जातात. वेबसाइट - https://www.mafsu.ac.in/
- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संबंधित महाविद्यालये व अभ्यासक्रमांसाठी https://www.muhs.ac.in/ ही वेबसाइट पाहावी.