भाषांतरकार : नोकरीच्या संधीचे नवे भांडार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 02:46 AM2018-06-21T02:46:14+5:302018-06-21T02:46:14+5:30

जागतिकीकरणामुळे संपूर्ण जग कवेत आले आहे. त्यामुळे सध्याच्या काळात भाषांतराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

Translator: New job opportunity new job | भाषांतरकार : नोकरीच्या संधीचे नवे भांडार

भाषांतरकार : नोकरीच्या संधीचे नवे भांडार

googlenewsNext

जागतिकीकरणामुळे संपूर्ण जग कवेत आले आहे. त्यामुळे सध्याच्या काळात भाषांतराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. वेगवेगळ्या देशांच्या संस्कृतीच्या किंवा सामाजिकतेच्या सीमा ओलांडून नवनवीन ज्ञान प्राप्त करणे, हा कुठेतरी सर्वांसाठी उत्सुकतेचा किंवा ज्ञानाचा विषय ठरला आहे. एखाद्या विशिष्ट भाषेमधून दुसऱ्या भाषेमध्ये जो काही आशय किंवा मजकूर असेल, त्याला त्या विशिष्ट भाषेतील लोकांना कळेल, अशा शब्दांमध्ये गुंफून त्या आशयाची बांधणी करणे, म्हणजेच भाषांतर होय. एका भाषेमधून दुसºया भाषेमधील आशय किंवा मजकूर, त्याच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता दुसºया भाषेत अनुवादित करणे, म्हणजेच भाषांतर होय. मात्र, यासाठी दोन्ही भाषांचे सर्वांगीण ज्ञान भाषांतरकाराला असायला हवे. यामध्ये जर तुम्ही प्रावीण्य मिळवले तर तुमच्यासाठी संधीचे भांडार खुले आहे.
भाषांतरामधील संधी
विविध दस्तावेज किंवा
कागदपत्रांचे भाषांतर :
प्रशासकीय कार्य हे एका विशिष्ट भाषेतून चालते. मात्र, इतर भाषांमध्येसुद्धा त्याचे भाषांतर करण्याची गरज भासते. भारताचाच विचार केला, तर भारतात विभिन्न राज्यांमध्ये भिन्न भिन्न भाषा बोलल्या जातात आणि त्या त्या राज्याचे कार्य त्या त्या भाषेतून होत असते. केंद्र सरकारचे काम हिंदी किंवा इंग्रजी या भाषांमधून होते, तर राज्य सरकारचे काम स्थानिक भाषेमधून होते (उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर शासकीय कार्य हे मराठीतून होते). मग अशा वेळेला वेगवेगळे कागदपत्र, दस्तावेज यांचे भाषांतर करण्याची गरज भासते. अनेक वेळा सरकारी कचेरीमधून म्हणजेच कोर्टकचेरीमधूनही भाषांतराची गरज भासत असते.
विविध कायद्यांची अंमलबजावणी करत असताना त्या कायद्यांचे रूपांतर त्या विशिष्ट भाषेमध्ये करून मगच ते लोकांपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे शासकीय अनुवाद हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्याला प्रशासकीय अनुवादाची जोड आहे.
जाहिरातीचे भाषांतर
बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतामध्ये प्रवेश केल्यापासून त्यांच्यासाठी बाजारपेठ विस्तारण्यासाठी किंवा स्वत:चे उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचे एक महत्त्वाचे माध्यम म्हणजे जाहिरात होय. त्यामुळे जाहिरातींमध्ये सुद्धा भाषांतराची नवीन संधी उपलब्ध झाली आहे. जाहिरातींचे भाषांतर करत असताना त्यात त्या त्या कल्पना म्हणजे जाहिरात जशी मुळात सर्जनात्मक असते, ती सर्जनशीलता दुसºया भाषेमध्ये जशीच्या तशी येणे आवश्यक असते. त्यामुळे पटकन लोकांच्या मनाचा ठाव घेणारी, लोकांना चटकन उच्चारता येणारी, त्यांना पाठ होणारी अशी जाहिरात तयार करावी लागते.
वेगवेगळ्या जाहिरातींच्या टॅगलाइन किंवा कॅचलाइन यांचे इतर भाषांमध्ये भाषांतर करत असताना खूप कसरत करावी लागते. एखाद्या जाहिरातीसाठी जे काही मसुदा लेखन केले जाते. त्या मसुदा लेखनाचे भाषांतर आजकाल आवश्यक झाले आहे.
हे भाषांतर करत असताना त्यामध्ये खूप जास्त सावध राहणे आवश्यक आहे. भारताचा विचार केला तर इंग्रजीमधील जाहिराती या मराठी, गुजराथी, हिंदी, पंजाबी, तामिळ, बंगाली, कानडी ,तेलुगू, मल्याळम, ओरिया अशा भाषांमध्ये भाषांतरीत कराव्या लागतात, त्यामुळे भाषांतरकाराला मसुदा लेखनाचे भाषांतर हे एक महत्त्वाचा पर्याय उपलब्ध आहे. विभिन्न प्रादेशिक भाषांमध्ये ज्यांनी आपली पदवी घेतली आहे. त्यांना भाषांतराची संधी उपलब्ध असते, अर्थात त्यासाठी त्यांना ज्या भाषेतून भाषांतर करायचे ती भाषा आणि ज्या भाषेत भाषांतर करायची ती भाषा, यावर प्रभुत्त्व असणे आवश्यक असते. महाराष्ट्राचाच विचार केला तर मराठीतून बीए, बीएमएम करणारे अशा पदवीधारकांना भाषांतराचे हे माध्यम उपलब्ध आहे. इतर भाषांवर असलेले प्रभुत्त्व, संगणकीय ज्ञान, इतर कौशल्य, इतर भाषांमधील पुस्तकांचे वाचन हे जर व्यवस्थित असेल, तर ती व्यक्ती आणखीन जास्त चांगल्या
पद्धतीने भाषांतर करू शकते. एकूणच भाषांतरासाठी अशी बरीचशी दालने आता उपलब्ध आहेत.
>पुस्तकाचे भाषांतर
भाषांतरामधला सर्वात जास्त चर्चित व लोकांना माहीत असलेले भाषांतर म्हणजे पुस्तकांचे भाषांतर होय. गेल्या दोन दशकांमध्ये विभिन्न देशांतल्या गाजलेल्या पुस्तकांचे किंवा गाजलेल्या लेखकांच्या प्रसिद्ध साहित्यकृतींचे भाषांतर करण्याची जणू काही स्पर्धाच लागली आहे. असे बाजारात असलेल्या एकूण पुस्तकांमधून दिसते. भारताचा विचार केला तर अमेरिका, युरोप, रशिया, जर्मनी इथल्या पुस्तकांचे अनुवाद आपल्याकडे उपलब्ध होताना दिसतात. याखेरीज भारतीय भाषांमधले भिन्न भिन्न भाषांमधल्या गाजलेल्या कादंबºया, कथासंग्रह, कविता यांचेसुद्धा भाषांतर होताना आपल्याला दिसते. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त पुस्तकांचे भाषांतर तर हमखासच होते. याखेरीज अत्यंत गाजलेल्या आणि चर्चेत असलेल्या पुस्तकांचेसुद्धा भाषांतर होताना आपल्याला दिसते आणि त्यामुळे भाषेची मर्यादा ओलांडून त्या त्या विषयातील साहित्यप्रेमींना हा पुस्तकांचा ठेवा प्राप्त होतो. यात वेगवेगळ्या प्रकाशन संस्था लेखकाला मानधन देतात. विविध माध्यमे लोकरुचीनुसार त्यांना मजकूर पुरवीत असतात. यामध्ये वृत्तपत्रे, सिनेमा, रेडिओ , टेलिव्हिजन या सर्वच माध्यमांचा समावेश होतो. यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आशय, त्याचे बिनचूक भाषांतर करावे लागते. मात्र, त्याच बरोबर त्या त्या मालिका किंवा चित्रपटाप्रमाणे त्यात काही बदल केले जातात, म्हणजेच मूळ इंग्रजीतल्या किंवा दक्षिण भारतीय भाषेतल्या चित्रपटांसाठी सबटायटल्स किंवा डबिंग ज्या वेळेला हिंदीमध्ये केले जाते, तेव्हा त्यात हिंदीतील काही गाजलेली उदाहरणे टाकावी लागतात, हा याच्यातील फरक आहे.

Web Title: Translator: New job opportunity new job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.