यूजीसीने पीएचडीसाठी विदेशी विद्यार्थ्यांना दारे केली खुली; प्रत्येक प्राध्यापकाचे २ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 05:51 AM2022-05-18T05:51:46+5:302022-05-18T05:52:29+5:30
केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाने विदेशी विद्यार्थ्यांसाठी पीएचडी करण्यासाठी भारतीय विद्यापीठांची दारे खुली केली आहेत.
शरद गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विदेशी विद्यार्थ्यांसाठी पीएचडी करण्यासाठी भारतीय विद्यापीठांची दारे खुली केली आहेत. भारतीय विद्यार्थी न मिळाल्यास रिक्त जागी विदेशी विद्यार्थ्याला भारतात पीएचडी करण्याची संधी मिळत असे, त्यामुळे यूजीसीने विदेशी विद्यार्थ्यांना भारतात पीएचडी करता यावी, म्हणून वेगळी तरतूद केली आहे.
यूजीसीने आता प्रत्येक प्राध्यापकाला आपल्या मार्गदर्शनाखाली पीएचडीसाठी दोन विदेशी विद्यार्थी घेण्याची परवानगी दिली आहे. विदेशी विद्यार्थ्यांमुळे भारतीय विद्यार्थ्यांच्या पीएचडीच्या प्रवेशावर कोणताही परिणाम होणार नाही. कारण विदेशी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे जागांची व्यवस्था केली जात आहे. विदेशी विद्यार्थ्यांच्या विशेष जागांवर सरकारचे आरक्षण धोरण लागू होणार नाही. दरवर्षी नऊ लाख भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी विदेशी जातात. त्यामुळे भारतातून २० हजार कोटी रुपयांचे विदेशी चलन बाहेर जाते. हे रोखण्यासाठी यूजीसीने आता विदेशातील उच्च शैक्षणिक संस्थांना भारतात आपले केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
नेपाळचे २८% विद्यार्थी
भारतात सध्या १६५ देशांचे ५० हजारांहून जास्त विदेशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी दोन तृतीयांश विद्यार्थी नेपाळ, अफगाणिस्तान, बांग्लादेश, भूतान आणि सुदानचे आहेत. सर्वाधिक २८ टक्के विद्यार्थी नेपाळहून भारतात शिक्षणासाठी येतात.