क्लास परवडेना! इंटरनेटवरुन अभ्यास करत UPSC क्रॅक; जिद्दी तरुणाचा प्रेरणादायी प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 11:51 AM2022-06-07T11:51:18+5:302022-06-07T12:21:35+5:30
या तरुणाने इंटरनेटलाच आपले गुरु बनविले. मेहनतीवर विश्वास ठेवला अन् UPSC परीक्षेत वरचे रँकिंग मिळवले.
नवी दिल्ली: UPSC ची परीक्षा देशातील अतिशय कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. UPSC ची परीक्षा क्रॅक करणे ही अजिबात सोपी गोष्ट नाही. सातत्य, चातुर्य, चिकाटी, मेहनत, परिश्रम आणि अपार अभ्यास यांच्या जोरावरच यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होता येते. त्यात रँकिंगमध्ये येणे ही त्यातून अवघड गोष्ट. मात्र, एका जिद्दी तरुणाने ही किमया साकार केली आहे. महागडे कोचिंग क्लासेस परवडत नाही म्हणून चक्क इंटरनेटवरून अभ्यास करून या तरुणाने UPSC ची परीक्षा केवळ उत्तीर्ण केली नाही. तर, संपूर्ण देशात ३४० वा रँकही मिळवला.
यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रत्येकाची कहाणी प्रेरणादायी आहे. आयएएस होण्यापूर्वीचे प्रशिक्षण अधिक कठोर मानले जाते. पण तुमचे शारीरिक व्यंग, दुर्बलता, आर्थिक परिस्थिती या गोष्टी यशाच्या आड येत नाहीत. हे निकालातून स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील संत नगरच्या राघवेंद्र शर्मा याची कहाणी देखील अशीच प्रेरणादायी आहे. तुमच्या मनातील जिद्द पक्की असेल आणि मेहनत घेण्याची तयारी असेल तर यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकत नाही, हेच राघवेंद्र शर्मा याच्या उदाहरणावरून अधिक स्पष्ट होते.
इंटरनेटलाच आपले गुरु बनविले
इंटरनेट हे दुधारी शस्त्रासारखे आहे. त्याचे जितके चांगले परिणाम आहेत, तितके वाईटही असल्याचे सांगितले जाते. आजच्या काळात जगातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर इंटरनेटकडे आहे, अशी मान्यता आहे. इंटरनेटचा चांगला उपयोग फारच कमीजण करतात. या कमी जणांमध्ये राघवेंद्र शर्मा याचा नंबर लागतो. त्याने इंटरनेटच्या मदतीन यूपीएससी क्रॅक केली. पैशाच्या कमतरतेमुळे राघवेंद्रला यूपीएससीच्या प्रत्येक कोर्सचे कोचिंग घेता आले नाही. असे असताना हार न मानता त्याने इंटरनेटलाच आपले गुरु बनविले आणि आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवून त्याने अभ्यास सुरु ठेवला. आणि याचे फळ त्याला यूपीएससी निकालात मिळाले.
अपयशाने पाठ सोडली नव्हती
यूपीएससीच्या तयारीसाठी कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही. जीएसची तयारी मित्रांकडून नोट्स मागवून केल्याचे राघवेंद्र शर्मा याने सांगितले. सोशल मीडियावर एक ग्रुप तयार करून इतर इच्छुकांसह त्याने नोट्स शेअरिंग केले. यूपीएससी कोचिंग खूप महाग असल्याने आर्थिकदृष्ट्या परवडणार नसल्याने राघवेंद्रने हा मार्ग निवडला. राघवेंद्र पहिल्याच प्रयत्नात मुलाखतीपर्यंत पोहोचला. मात्र अंतिम गुणवत्तेतमध्ये २ गुण कमी पडले. अपयशाने त्याची पाठ सोडली नव्हती.
निराशा बाजूला सारुन मेहनतीने परीक्षा दिली
दुसऱ्या प्रयत्नात राघवेंद्रने सर्व प्रयत्न केले आणि यूपीएससीमध्ये ऑल इंडिया ३४० क्रमांक मिळाला. अंतिम निकाल लागल्यानंतर पुढील प्रिलिम्स परीक्षा अवघ्या १४ दिवसांवर होती. पहिल्याच प्रयत्नात आपण यशस्वी होऊ याची खात्री त्याला होती. यामुळे वर्षभराची मेहनत व्यर्थ गेली आणि राघवेंद्रने पुन्हा नव्याने तयारी केली. ही निराश होण्याची वेळ नाही, हे त्याला समजले होते. अशा परिस्थितीत तो निराशा बाजूला सारुन मेहनतीने परीक्षेला सामोरा गेला आणि यावेळी त्याने यूपीएससी क्रॅक केली.