तुमचं भविष्य तुमच्या उत्पन्नावर नाही, खर्चावर ठरतं!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 02:57 PM2017-11-07T14:57:13+5:302017-11-07T15:01:32+5:30
लाइफस्टाइलवर तुम्ही दरमहा किती खर्च करता, त्यावर ठरेल तुमचा उद्या कसा आहे ते...
- मयूर पठाडे
अनेक जण आपल्याला विचारतात, तुझी कमाई किती? किती कमवतोस तू दरमहा? लग्नाच्या बाजारात, म्हणजेच तरुणांच्या आयुष्यात तर या कमाईचं महत्त्व अपरंपार आहे. वधुपिताही नवºया मुलाला हाच प्रश्न विचारतो आणि आजही आपल्याकडच्या ९९ टक्के लग्नांमध्ये हाच घटक अतिशय परिणामकारक ठरतो, पण खरंतर कमाई किती करतो, यापेक्षाही यावर भर द्यायला हवा की, तू खर्च किती करतोस? कमाईपेक्षा खर्च जास्त असेल तर अर्थातच तो आतबट्ट्याचा व्यवहार आहे आणि अशा प्रकारांतून लवकरच त्या माणसाचं दिवाळं निघणार हेदेखील उघड सत्य आहे.
आपला खर्च वास्तव आहे का, योग्य कारणांवर योग्य तितकाच खर्च आपण करतो का, याकडे प्रत्येकानं अतिशय जाणीवपूर्वक पाहाणं अतिशय महत्त्वाचं आहे.
आपला सर्वाधिक खर्च कशावर होतो तुम्हाला माहीत आहे? जगभरातल्या अभ्यासकांचं यावर एकमत आहे आणि ते म्हणजे प्रत्येकाचा जास्तीत जास्त खर्च लाइफस्टाइलवर होतो. अगदी गरीबापासून ते श्रीमंतांपर्यंत कोणीही याला अपवाद नाही. आपली लाइफस्टाइल आणखी उच्च व्हावी आणि आपण आणखी पुढच्या श्रेणीत जावं किंवा आहे ती लाइफस्टाइल तरी आपण मेन्टेन करावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण मुख्य गोची इथेच आहे.
आपल्या लाइफस्टाइलवरचा खर्च आपण आटोक्यात आणला तर अनेक गोष्टींसाठी आपल्याला पैसा उपलब्ध होऊ शकतो. कारण लाइफस्टाइलसाठी केलेला खर्च हा अत्यावश्यक खर्च नाही. तो खर्च केला नाही, तर काहीच बिघडत नाही. अर्थातच हा खर्च करुच नये असं बिलकुल नाही. मग तो किती करावा? अभ्यासकांचं म्हणणं आहे, हा खर्च आपल्या उत्पन्नाच्या जास्तीत जास्त तीस टक्के असावा. या तीस टक्क्यांच्या बाहेर हा खर्च तुम्ही जाऊ देऊ नका आणि अनावश्यक खर्चाकडेही थोडं डोळे वटारुन पाहा. तुम्ही जर मुळातच त्यापेक्षा कमी रक्कम खर्च करत असाल तर चांगलीच गोष्ट आहे, मग त्यातही थोडं वाचवून बघा.. अनेक प्रश्न एकदम सोपे होऊन जातील..
कराल मग हा उपाय? निदान सुरुवात करायला तरी काय हरकत आहे?