शाळांच्या स्वच्छतेसाठी मिळाला १ कोटी ३८ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:31 AM2021-03-01T04:31:42+5:302021-03-01T04:31:42+5:30
मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना संकटामुळे शाळा बंद होत्या. दीड महिन्यांपूर्वी ९ वी ते १२ चे तर २७ जानेवारीपासून ...
मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना संकटामुळे शाळा बंद होत्या. दीड महिन्यांपूर्वी ९ वी ते १२ चे तर २७ जानेवारीपासून ५ ते ८ वीचे वर्ग सुरू करण्याची शासनाने परवानगी दिली. मात्र, ही परवानगी देतानाच कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य काळजी घेण्याचेही बजावण्यात आले आहे. यासाठी स्वच्छता, सॅनिटायझर, मास्क एवढेच नाही तर साबण, पाणी पुरविण्याच्या सूचना शासनाने शिक्षण विभागाला दिल्या. त्यानुसार शाळांनी तयारी सुरु करून शाळा सुरू केली. मात्र, निधीची कमतरता आणि शासनाचे आदेश यामुळे इकडे आड, तिकडे विहीर अशी काहीशी अवस्था मुख्याध्यापक, शिक्षकांची झाली होती. त्यातच काही ग्रामपंचायतींनी हात वर केल्यामुळे स्वच्छतेसाठी लागणारा खर्च भागविताना मुख्याध्यापकांची चांगलीच कसरत बघायला मिळाली. अनेक मुख्याध्यापकांनी स्वत:च्या खिशातून खर्च केला. मात्र, आता शाळा सुरू झाल्यानंतर शासनाने जिल्हा परिषद शिक्षण विभागाला स्वच्छतेसाठी प्रतिशिक्षक २ हजार ४५५ रुपयाप्रंमाणे शाळांच्या पोषण आहार योजनेच्या खात्यात निधी जमा केला आहे. त्यामुळे सध्यातरी शाळांची स्वच्छता, सॅनिटायझरची समस्या सुटली आहे.
जिल्हा परिषद शाळा
१,५५७
मिळालेला निधी
१,३८,६५०००
प्रती शिक्षक निधी
२ हजार ४५५
स्वच्छतेसाठी शाळांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात आले आहे. यातून स्वच्छतागृहांची स्वच्छता तसेच इतर आवश्यक बाबींवर खर्च करता येणार आहे.
- दीपेंद्र लोखंडे,
शिक्षणाधिकारी, प्राथमिक