१ कोटी ४४ लाख ८० हजारांचा अमली साठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 03:42 PM2024-04-24T15:42:18+5:302024-04-24T15:43:54+5:30
Chandrapur : प्रशासनाची कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांकडून तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत नियम व नियमन २०११ प्रतिबंध अन्नपदार्थ कारवाई अंतर्गत एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत १५ प्रकरणांत १३ हजार ३२९ किलो असा एकूण किंमत १ कोटी ४४ लाख ८० हजार २२७ रुपयांचा साठा जप्त केल्याची माहिती राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या आढावा बैठकीतून देण्यात आली. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या अध्यक्षतेत मंगळवारी पडली.
यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटरे, जिल्हा मौखिक कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप पिपरे, डॉ. श्वेता सावलीकर, डॉ. वनिता गर्गेलवार, शिक्षणाधिकारी (माध्य.) निकिता ठाकरे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, तंबाखू प्रतिबंध उपाययोजनेबाबत जिल्हाभरात जनजागृती कार्यक्रम घेऊन नागरिकांना तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत अवगत करावे. तसेच शाळा- महाविद्यालयाच्या १०० मीटर परिसरात तंबाखू विक्री करण्यास मनाई आहे. याबाबत शाळांकडून माहिती मागवून त्यांच्या परिसरात तंबाखू विक्रीची दुकाने नाहीत, याबाबत हमीपत्र घ्यावे. शासकीय कार्यालयात तंबाखू प्रतिबंधासाठी भरारी पथके स्थापन करावीत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
५५ हजार ३७० रुपयांचा दंड वसूल
सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ कायदा (कोटपा) कलम ४ अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने सन २०२३-२४ मध्ये ५६६ नागरिकांकडून ५५,३७० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलिस विभागाच्या वतीने गतवर्षी २०७६ प्रकरणांत ४ लाख १५ हजार २०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
यावर झाली चर्चा
मागील सभेचे इतिवृत्त, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत कार्याचा अहवाल सादर करणे, ३१ मे रोजी जागतिक तंबाखू नकार दिन साजरा करणे, जिल्ह्यामध्ये कोटपा कायदा कलम ४, कलम ५, कलम ६ (अ) आणि (ब) प्रभावी अंमलबजावणीबाबत चर्चा करणे, पोलिस, अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील शाळा तंबाखूमुक्त व तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.