विदर्भ कोकण बँकेतील १ कोटी ७ लाख लंपास; तीन बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 12:52 PM2024-11-09T12:52:11+5:302024-11-09T12:53:30+5:30
Chandrapur : बँक अधिकाऱ्यानेच परस्पर स्वतःच्या व अन्य दोघांच्या खात्यात वळवल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या भद्रावती शाखेतून ३६ खातेदारांचे १ कोटी ७ लाख रूपये बँक अधिकाऱ्यानेच परस्पर स्वतःच्या व अन्य दोघांच्या खात्यात वळते केले. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ८) उघडकीस आली. बैंक व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. बैंक अधिकारी रजत ईटनकर, सुरज कुमार साहू (रा. नागपूर), प्रदीप दूधभाते (रा. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.
विदर्भ कोकण ग्रामीण बँक भद्रावती शाखेचे व्यवस्थापक अमोल कठाळे यांचा १ सप्टेंबर रोजी अपघात झाला. त्यामुळे रजेवर होते. या कालावधीत बँकेचे मुख्य अधिकारी म्हणून रजत इटणकर यांच्याकडे जबाबदारी होती. दरम्यान, पार्वता काकडे यांच्या बैंक खात्यातून ३ लाख ५० हजार रूपये परस्पर काढल्याची तक्रार बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली. चौकशीअंती इटनकर यांनीच शेगाव शाखेत कार्यरत असताना हा गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाले. याविरूद्ध शेगाव ठाण्यात तक्रार झाली. आरोपी अधिकारी इटणकर यांच्यावर वरिष्ठांना संशय आल्याने भद्रावती शाखेतील खातेदारांचीही तपासणी केली. त्यात ऑगस्ट २०२४ ते ऑक्टोबर २०२४ पर्यंत ३६ खातेदारांच्या खात्यातून १ कोटी ७ लाख गहाळ केल्याचे उघडकीस आले. ही रक्कम इटणकरने बँक अधिकारी असलेल्या सुरज कुमार साहू व प्रदीप दूधभाते या मित्रांच्या संगनमताने आरटीजीएस, नेफ्ट व रोखद्वारे गहाळ केल्याचे आढळून आले. पुढील तपास ठाणेदार अमोल काचोरे करीत आहेत.
अशी वळती केली रक्कम
बँकेतून ऑनलाइन किंवा रोख रक्कम खात्यातून दुसऱ्या खात्यात टाकायचे असेल, तर एन्ट्री करण्यास बँक अधिकारी लागतो. हा अधिकारी व्हेरिफाय करतो. जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत रक्कम दुसऱ्या खात्यात वळती होत नाही. आरोपी रजत इटनकर याच्या प्रक्रियेला सुरत साहू व प्रदीप दूधभाते हे दोघे अधिकारी व्हेरिफाय करत होते. तिघांच्या संगनमतातून १ कोटी ७ लाखांची रक्कम परस्पर वळती करण्यात आली.
"विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या ३६ खातेदारांचे १ कोटी ७ लाख रूपये परस्पर वळते करण्यात आले. मात्र खातेदारांनी घाबरू नये. काही खातेदारांची रक्कम परत मिळाली. उर्वरित रक्कमही लवकरच जमा होणार आहे."
-अमोल कठाळे, शाखा व्यवस्थापक विदर्भ कोकण ग्रामीण बँक, भद्रावती