चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरीच्या भूमीपुत्राला अमेरिकेकडून १० कोटींचे अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 10:58 AM2018-09-29T10:58:05+5:302018-09-29T10:58:31+5:30
अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील सहयोगी प्रोफेसर व गोंडपिपरीचे भूमीपुत्र डॉ. सुदर्शन कुरवडकर यांनी तयार केलेल्या प्रकल्पाला अमेरिकन सरकारने पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
राजेश माडुरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील सहयोगी प्रोफेसर व गोंडपिपरीचे भूमीपुत्र डॉ. सुदर्शन कुरवडकर यांनी तयार केलेल्या प्रकल्पाला अमेरिकन सरकारने पुरस्कार देऊन गौरव केला आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना तब्बल १.५. मिलियन डॉलर (दहा कोटी रुपये) देण्यात आले आहेत.
या रकमेचा वापर कॅलिफोर्निया विद्यापीठातील स्पॅनिश विद्यार्थ्यांच्या विकासासाठी करण्यात येणार आहे. विज्ञान, गणित, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान या विषयात विद्यार्थ्यांचा विकास आणि अधिक संशोधनासाठी हा निधी त्यांच्या सुपूर्द करण्यात आला आहे. या निधीचा सदुपयोग करण्याचा अधिकारही त्यांनाच दिला आहे. ही भारतासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे.
कॅलिफोर्निया विद्यापीठात अमेरिकसह देश-विदेशातील हजारो तरूण शिक्षण घेतात. मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथील कुरवडकर हे गेल्या अनेक वर्षांपासून या विद्यापीठात सहयोगी प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. पर्यावरण व अभियांत्रिकी या विषयात त्यांचा हातखंडा आहे.
विद्यापीठात अमेरिकन विद्यार्थ्यांसह सुमारे चाळीस हजार स्पॅनिश विद्यार्थी शिकत आहेत. संगणक विज्ञान व अभियांत्रिकीत हे विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे असल्याचे डॉ. सुदर्शन कुरवडकर यांच्या लक्षात आले. यामुळे हा वर्ग मुख्य प्रवाहात यावा, यासाठी डॉ. कुरवडकर यांनी एक प्रकल्प तयार केला. यातून त्यांनी स्पॅनिश विद्यार्थ्यांची कैफियत मांडली. सोबत त्यांच्या विकासासाठीच्या विस्तृत उपाययोजना सांगितल्या. अमेरिकन सरकारच्या राष्ट्रीय विज्ञान संस्थेने या प्रकल्पाची दखल घेतली. यानंतर डॉ. सुदर्शन कुरवडकर यांना तब्बल १.५ मिलियन डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार दहा कोटी रुपये देण्यात आले आहेत.