राष्ट्रीय अधिवेशनासाठी शिक्षकांना १० दिवसांची नैमित्तिक रजा मंजूर
By admin | Published: December 11, 2015 01:36 AM2015-12-11T01:36:45+5:302015-12-11T01:36:45+5:30
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे २७ वे द्विवार्षिक अधिवेशन बंगळूरू येथे १७ ते २० डिसेंबरदरम्यान होणार आहे.
बंगळूरूला अधिवेशन : तीन हजार प्राथमिक शिक्षक होणार सहभागी
चंद्रपूर : अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे २७ वे द्विवार्षिक अधिवेशन बंगळूरू येथे १७ ते २० डिसेंबरदरम्यान होणार आहे. देशभरातील प्राथमिक शिक्षक या अधिवेशनात सहभागी होणार असून, चंद्रपूर जिल्ह्यातून तीन हजार शिक्षक या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. या अधिवेशनासाठी ग्रामविकास व जलसंधारण विभागाने संघटनेच्या शिक्षकांसाठी १० दिवसांची नैमित्तिक रजा मंजूर केली आहे.
अधिवेशनात सहभागी होणाऱ्या शिक्षकांनी संबंधित अधिकाऱ्याकडे अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. शिक्षक, निमशिक्षक, सहाय्यक शिक्षक, पदविधर शिक्षक, मुख्याध्यापक यातील अधिवेशनास उपस्थित राहणाऱ्यांनी अर्ज केल्यानंतर सदरची रजा गटशिक्षणाधिकारी यांनी मंजूर करावी, अधिवेशनास उपस्थित राहिल्याबद्दल सेवापुस्तकात विशेष रजेची नोंद घेण्यात यावी, अधिवेशन कालावधीत शाळेचे कामकाज सुरू राहण्याबाबत योग्य ती खातरजमा संबंधित अधिकाऱ्यांनी केल्यानंतरच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येईल, असेही शासन आदेशात नमूद आहे.
बंगळूरू येथील अधिवेशनात स्वच्छ विद्यालय-स्वच्छ भारतच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व, शिक्षणाचे होत असलेले खासगीकरण आणि व्यापारीकरण, सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणातून आर्थिक विकास आदी महत्त्वांच्या विषयावर विचारमंथन होणार असून, देशभरातील शिक्षण तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सोबतच शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षणाचे खासगीकरण बंद करणे, सातवा वेतन आयोग लागू करणे, शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करणे, शिक्षकांना विनाअट वेतनश्रेणी देण्यात यावी, आदी मागण्यांकडेही यावेळी लक्ष वेधण्यात येणार आहे. या अधिवेशनात शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष विजय शास्त्रकार, उपाध्यक्ष गिरीधर गेडाम, कार्याध्यक्ष संभा पारोधे, सरचिटणीस सतीश बावणे, उपसरचिटणीस रविकांत आसेकर, सुभाष कासनगोट्टुवार आदींनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)