दहा लाखांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:13 AM2018-01-07T00:13:10+5:302018-01-07T00:13:31+5:30
दारूबंदी मूल, भद्रावती व सिंदेवाही तालुक्यात पोलिसांनी टाकलेल्या धाडीत दहा लाखांच्या दारूसह २० लाखांची मुद्देमाल जप्त केल्याची घटना शनिवारी घडली.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : दारूबंदी मूल, भद्रावती व सिंदेवाही तालुक्यात पोलिसांनी टाकलेल्या धाडीत दहा लाखांच्या दारूसह २० लाखांची मुद्देमाल जप्त केल्याची घटना शनिवारी घडली. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूल : दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या पथकाला माहित होताच येथील रेल्वे क्रासिंगजवळ नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान, सिंदेवाही वरून चंद्रपूरकडे जात असलेल्या दोन वाहनांची तपासणी करून ५ लाख ६० रुपयांची दारू जप्त केली. आशिष अशोक मुळे (२३) रा. खरबी ता. ब्रह्मपुरी, स्वप्नील शामदेव पाल (२१) रा. मांगली ता. नागभीड, विकेश जांभुळे (२३) रा. कन्हाळगाव ता. पवनी जि. भंडारा अशी आरोपींची नावे आहे. आरोपींकडून दोन चारचाकी वाहन आणि चार भ्रमणध्वनी जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात दारूबंदी असतानाही मूल तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची वाहतुक व विक्री होत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल हिरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक एम.डी. कुमरे, हवालदार गुलाब बलकी, महेश पतरनगे, नरेंद्र अंडेलवार, प्रभाकर गेडाम आदींनी एम.एच.४० ए.आर. ०१९२ क्रमांकाच्या वाहनाची तपासणी करून दारू जप्त केली. पोलीस येत असल्याचे पाहून वाहनातील दोन आरोपी घटनास्थळावरून पळाले. वाहनचालक आशिष अशोक मुळे (२३) याला अटक करण्यात आली. याशिवाय,एम.एच. १८ डब्ल्यू.८७५५ क्रमांकाचे महेंद्र मॅक्स वाहनातून दारू जप्त केली. वाहन चालक स्वप्नील शामदेव पाल व विकेश जांभुळे (२३) या दोघांना अटक केली. आरोपींकडून दोन चारचाकी वाहन, चार भ्रमणध्वनी जप्त करण्यात आले.
या मुद्देमालाची किमंत २० लाख ७५ हजार ५०० रुपये आहे. आरोपींवर मुंबई दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्य पोलीस निरीक्षक अमोल शिंदे करीत आहेत.
ढोरवासा येथे दोन लाखांचा दारूसाठा जप्त
भद्रावती : ढोरवासा खाणीजवळील वर्धा नदीच्या घाटावरुन पोलिसांनी दोन लाखांची दारू जप्त केली. मात्र, सर्व आरोपी फरार झाले. ही कारवाई शनिवारी च्या पहाटे करण्यात आली. ढोरवासा घाटावरुन दारूची वाहतूक करणाºया एमएच ३४-एझेड २४४८ व एमएच ३४ एझेड ३८५८ या दुचाकींचा पोलिसांनी पाठलाग केला. दरम्यान, आरोपींनी दोन्ही वाहने सोडून फरार झाले. या दुचाकीतून दोन लाखांची दारू जप्त केली. ही कारवाई ठाणेदार बी.डी.मडावी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल आळंदे, सुनील ढवस, सचिन गुरनुले, केशव चिटगीरे, हेमराज प्रधान आदींनी केली. मागील काही दिवसांपासून कारवाई सुरू असल्याचे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
सिंदेवाहीत १४५ पेट्या जप्त
सिंदेवाही : वासेरा व आंबोली झुडपात पाठलाग करून पोलिसांनी १४५ पेट्या देशी व विदेशी दारू जप्त केली. दारूसह मुद्देमालाची किंमत २४ लाख ११ हजार रुपये असल्याची पोलिसांनी दिली. चारपैकी तीन आरोपी फरार झाले असून, एकाला करण्यात आली आहे. आरोपीचे नाव संजय रामदास भरडकर (२४) रा. सिंदेवाही असे आहे. एमएच ३४ के-०६७७ क्रमांकाची मारुती,३४-९३४९ क्रमांची टाटा एस आणि एमएच ३४-के-४३९८ क्रमाकांच्या वाहनातून दारू आणत असल्याची माहिती चंद्रपुरातील पोलिसांनी मिळाली. दरम्यान, पाठलाग करून ही कारवाई केली.