१० लाखांचे रोपवन गायब
By admin | Published: May 12, 2017 02:20 AM2017-05-12T02:20:47+5:302017-05-12T02:20:47+5:30
निसर्गाचा समतोल अबाधित राहावा, यासाठी वृक्षलागवड करण्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी
कुंपणानेच शेत खाल्ले : गोंडी विहिरगाव येथील प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : निसर्गाचा समतोल अबाधित राहावा, यासाठी वृक्षलागवड करण्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोन कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम अंमलात आणला. मात्र वन विभागातील कर्मचारी व अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने वृक्षलागवडीचा हा कार्यक्रम यशस्वी होण्यास बाधा निर्माण होत असल्याचा प्रकार चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील मौजा गोंडी विहिरगाव येथील कक्ष क्र. ७५३ मध्ये बघितल्यानंतर दिसून येते.
रोपवनावर १० लाख रुपये खर्च करण्यात आल्यानंतरही त्याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष झाल्याने रोपे करपली. आजच्या स्थितीत सदर जागेवर एकही रोप नसून झाडे झुडपे वाढली असल्याचे दिसून येते. यावरुन कुंपनानेच शेत खाल्ले की काय, असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.
शासन स्तरावर रोपवन लागवडीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन त्यांचे संगोपन करण्यासाठी वनविभागाच्या वतीने प्रयत्न केले जात आहे. मात्र चंद्रपूर वनविभागाअंतर्गत चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील मौजा गोंडी विहिरगाव येथील कक्ष क्र. ७५३ मध्ये जुलै २०१० मध्ये ५० हेक्टर जमिनीवर मिश्र रोपे लावण्यात आली. संयुक्त वनव्यवस्थापन समिती ताडाळाच्या वतीने करण्यात आलेल्या या रोपवनासाठी पाच वर्षांपर्यंत १० लाख रुपये खर्च करण्यात आले. सतत पाच वर्षे रोपावर खर्च निधी दाखविण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात त्या जमिनीवर एकही रोपण केलेला वृक्ष आढळत नसल्याने सतत पाच वर्षे कुठल्या रोपावर निधी खर्च केला, हा प्रश्नच आहे.
या रोपवनासाठी रोप आणणे, खड्डे खोदणे, कुंपन करणे आदींवर लाखो रुपये करण्यात आले. संयुक्त वनव्यवस्थापन समिती ताडाळाच्या वतीने सदर जागेवर मिश्र रोपे लावण्यासाठी वनविकास यंत्रणा चंद्रपूरच्या वतीने ३१ मार्च २०१० ला समितीला दोन ६१ हजार २५० रुपयांचा धनादेश प्राप्त झाला. त्यानंतर २ जुलै २०११ ला ३ लाख ६१ हजार रुपयांचा धनादेश प्राप्त झाला. २१ मार्च २०१४ पर्यंत १० लाख २६ हजार १२४ रुपये प्राप्त झाले. सतत पाच वर्षे रोपावर निधी खर्च दाखविण्यात आला.
रोपे वाढविण्यासाठी प्रयत्नच झाला नसल्याचे दिसून येते. आजच्या स्थितीत मूल तालुक्यातील गोंडी विहीरगाव येथील कक्ष क्र. ७५३ मधील ५० हेक्टर संरक्षित वनामध्ये एकही रोप आढळून येत नाही. आजच्या स्थितीत एकही रोप दिसत नसल्याने कुंपनानेच शेत खाल्ले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या क्षेत्रातील या गोंडी विहीरगाव येथे असा प्रकार होत असेल तर इतरही ठिकाणी काय स्थिती असावी, याचा विचार न केलेलाच बरा.