आजोबाच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातवाला बिबट्याने नेऊन केले ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2022 10:45 AM2022-03-31T10:45:01+5:302022-03-31T10:48:01+5:30
प्रतीक हा घराच्या मागील बाजुला उभा होता. तितक्यात घरालगत असलेल्या नाल्याच्या दिशेने अचानक बिबट आला. त्याने प्रतीकची मान जबड्यात पकडून उचलून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.
दूर्गापूर(चंद्रपूर) : आजोबाच्या अंत्यसंसकारासाठी आलेल्या नातवाला घरामागून बिबट्याने उचलून नेत ठार केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास ऊर्जानगरलगतच्या नेरी येथे घडली. प्रतीक बावणे (वय सुमारे १०) असे मृतकाचे नाव आहे.
या परिसरात वाघ आणि बिबट्याने चांगलाच धूमाकूळ घातला आहे. काहीच दिवसांपूर्वी झालेल्या घटनेची ही पुनरावृत्ती असल्याचे बोलले जात आहे. या घटनेने नागरिक चांगलेच संतप्त झाले आहे. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी नागरिकांची गर्दी होती. घरापासून काही अंतरावर प्रतीकचा मृतदेह आढळून आला. त्याचे धड आणि डोके वेगळे होते.
ऊर्जानगर नेरी येथील समता नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या तेजराम मेश्राम यांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्यांचे अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्कारासाठी भद्रावती येथून नातू प्रतिक बावणे हा आपल्या आईसोबत आला होता. रात्री उशिर झाल्याने तेजराम मेश्राम यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. घरी मृतदेह असल्याने घरातील मंडळी घराच्या परिसरातच वावरत होती.
प्रतीक हा घराच्या मागील बाजुला उभा होता. तितक्यात घरालगत असलेल्या नाल्याच्या दिशेने अचानक बिबट आला. त्याने प्रतीकची मान जबड्यात पकडून उचलून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. ही बाब काही जणांनी प्रत्यक्ष बघितली. यानंतर त्यांनी त्या दिशेने धाव घेतली. मात्र, काही अंतरावर प्रतीकचा मृतदेहच आढळून आला. त्याचे धड आणि मुंडके वेगळे होते.
या घटनेने हळहळ व्यक्त होत असली तरी घटनेची वार्ता परिसरात पोहचताच नागरिक चांगलेच संतापले आहे. वारंवार होणाऱ्या घटनांवर वनविभागाने नियंत्रण मिळविले नाही. ऊर्जानगर परिसरात एका वाघाला जेरबंद केल्यानंतर ही घटना घडली आहे. याच भागात काहीच दिवसांपूर्वी बिबट्याने एका मुलाचा बळी घेतला होता. या घटनेने नागरिकांमधील दहशत शांत होत नाही तोच ही घटना घडली.