धिडशी ग्रामपंचायतीचे १०० टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:38 AM2021-06-16T04:38:01+5:302021-06-16T04:38:01+5:30
राजुरा : राजुरा तालुक्यातील धिडशी ग्रामपंचायतीने गावात १०० टक्के लसीकरण पूर्ण केले आहे. आणखी काही गावे १०० टक्के लसीकरण ...
राजुरा : राजुरा तालुक्यातील धिडशी ग्रामपंचायतीने गावात १०० टक्के लसीकरण पूर्ण केले आहे. आणखी काही गावे १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याच्या मार्गावर आहेत.
लसीकरण करणे हाच कोरोनावरचा मुख्य उपाय आहे. यामुळेच मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली गट विकास अधिकारी ओम रामावत, पटवारी खोब्रागडे यांनी लसीकरणासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गावस्तरीय लसीकरण समितीची स्थापना केली आहे. समितीमधील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, शिक्षक, पोलीस पाटील -कोतवाल, अंगणवाडी सेविका, मदतनीस, उमेद अभियानातील बचत गटांच्या महिला, आशा यांना गावात जनजागृतीसाठी सूचित करून समितीमधील प्रत्येक सदस्याला प्रत्येकी १० ते २० नागरिकांना दत्तक घेऊन त्यांना लस घेण्यासाठी प्रेरित करून प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर घेऊन जाण्यापर्यंतची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तालुक्यात धिडशी ग्रामपंचायतीने १०० टक्के लसीकरण पूर्ण केले असून, चुनाळा, विहीरगाव, गोवरी, कढोली, चनाखा या गावांचे १०० टक्के लसीकरण लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. सध्या चिंचोली, देवाडा, कढोली या प्राथमिक आरोग्य केंद्रासह गावोगावी लसीकरण सुरू आहे. यासाठी जिल्हा लसीकरण अधिकारी संदीप गेडाम यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नगराळे, सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, नर्सेस परिश्रम घेत आहेत.