हुंड्यासाठी अडकले साडेसात हजार कुटुंब
By admin | Published: November 18, 2014 10:52 PM2014-11-18T22:52:23+5:302014-11-18T22:52:23+5:30
मागील काही वर्षात जिल्ह्यात ७ हजार ५०० कुटुंबाच्या विरोधात महिलांनी हुंड्यासाठी छळ करीत असल्याची पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यातील काही प्रकरण न्यायालयात आहे. मात्र या
चंद्रपूर : मागील काही वर्षात जिल्ह्यात ७ हजार ५०० कुटुंबाच्या विरोधात महिलांनी हुंड्यासाठी छळ करीत असल्याची पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यातील काही प्रकरण न्यायालयात आहे. मात्र या प्रकरणात महिलांवरील अत्याचाराचे प्रकरण किती खरे आणि किती खोटे याचा शोध घेण्याची गरज आहे. विशेष म्हणजे, महिला तक्रार निवारण केंद्र तसेच भारतीय परिवार बचाव संघटना चंद्रपूरतर्फे काही कुटुंबाना जोडण्याचे काम सुरु आहे.
दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. हे सत्य असले तरी काही महिलांकडून जाणूनबुजन पुरुषांना त्रास देण्याचा प्रकारही मागील काही वर्षांमध्ये समोर येत आहे. विविध कारण शोधून पुरुषांना फसविण्याच्या घटना सातत्याने वाढत आहे. सध्या ४९८(अ) या कलमाला गैरवापर होत असून पुरुष या कायद्याने भयभीत होत असल्याचे मत भारतीय परिवार बचाव संघटनेने व्यक्त केले आहे. कुटुंबात काही वाद झाल्यास महिला पोलीस स्टेशनचा रस्ता पकडतात. काही वेळा माहेरील लोकांकडूनही दबाव आण्यात येत आहे.
या प्रकारामुळे कुटुंब जोडण्याऐवजी तुटण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतीय परिवार बचाव संघटनेच्या चंद्रपूर शाखेने मागील एक वर्षामध्ये तब्बल ५५ कुटुंबीयांना जोडण्याचे काम केले आहे.
या व्यतिरिक्त पोलीस विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या महिला तक्रार निवारण केंद्रातूनही कुटुंब जोडण्याचे काम सुरु आहे. मात्र पाहिजे तसे यश अद्यापही आले नाही. त्यामुळे एकदा पत्नीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर त्या कुटुंबाची वाताहत होते.
महिलांनी अन्याय होत असल्यास नक्कीच ४९८ (अ) कलमाचा वापर करावा. मात्र विनाकारण त्रास देण्याच्या उद्देशाने एखाद्या कुटुंबाला फसविण्याचा पाप करू नये, असे मत भारतीय परिवार बचाव संघनेच्या चंद्रपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर यांनी व्यक्त केले आहे.
(नगर प्रतिनिधी)