१०३ अडते-व्यापारी आजपासून संपावर
By admin | Published: July 26, 2016 01:01 AM2016-07-26T01:01:38+5:302016-07-26T01:01:38+5:30
शेतमाल विक्रीतील अडत थेट व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या निर्णय राज्य शासनाने काही दिवसांपुर्वी घेतला.
चंद्रपूर बाजार समिती : ५० लाखांची उलाढाल थांबणार, भाजीपाला महागणार
चंद्रपूर : शेतमाल विक्रीतील अडत थेट व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या निर्णय राज्य शासनाने काही दिवसांपुर्वी घेतला. या निर्णयाविरोधात राज्यात विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांचा संप सुरू आहे. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडते व व्यापाऱ्यांनीही शासनाच्या निर्णयाचा विरोध दर्शवला असून मंगळवारपासून संप करण्याचा निर्णय घेतला आहे. या संपात भाजीपाला व फळे खरेदी-विक्री करणारे १०३ अडते व व्यापारांचा समावेश राहणार बाजार समितीची जवळपास ४० ते ५० लाखांची रोजची उलाढाल थांबण्याची चिन्ह आहेत.
व्यापाऱ्यांकडून अडत वसुलीचा नवीन अध्यादेश राज्य शासनाने काही दिवसांपुर्वीच काढला. या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याचे पत्र सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाला मिळाले आहे. नवीन अध्यादेशानुसार व्यापाऱ्यांकडून अडत वसूल झाल्याने अडत्यांच्या पैशावर टॅक्सचा बोझा पडणार आहे. पूर्वी शेतकऱ्यांकडून अडत कापली जात होती.
यामुळे अडत्यांना टॅक्स भरावा लागत नव्हता. यामुळे पूर्वी लपविली जाणारी धान्याची उलाढाल आयकर विभागाच्या नजरेत येणार आहे. शासनाच्या तिजोरीतून चोरी जाणाऱ्या करालाही ब्रेक लागणार असून बाजार समितीमधील प्रत्यक्ष उलाढाल समोर येणार आहे.
१३ लाख रुपयांपेक्षा अधिक उलाढाल झाल्यास अडत्यांना सेवा कर भरावा लागणार आहे. या प्रमुख कारणाने व्यापारी आणि अडत्यांनी खरेदी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व प्रकारात शेतकऱ्यांची मात्र चांगलीच कोडी होणार असून संपामुळे भाजीपाला व फळाचे दरही वाढण्याची शक्यता आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
बैठकीतही निर्णय नाही
संप टाळण्यासाठी चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने काही दिवसांपुर्वी अडते व व्यापाऱ्यांची बैठक घेतली. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे मंगळवारी होणारा संप अटळ दिसून येत आहे. चंद्रपूर बाजार समितीत दररोज ४० ते ५० लाखांच्यावर भाजीपाला व फळांची खरेदी-विक्री होते. मात्र संप झाला तरी या उलाढालीवर परिणाम होणार आहे. संपापुर्वी अडते व व्यापाऱ्यांशी पुन्हा चर्चा करणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाने म्हटले आहे.