१०३ गावांचे जलस्त्रोत दूषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 11:13 PM2018-07-10T23:13:55+5:302018-07-10T23:14:20+5:30
आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत जिल्ह्यातील तब्बल १०३ गावातील जलस्त्रोत दूषित असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. यानंतर नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
मंगेश भांडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत जिल्ह्यातील तब्बल १०३ गावातील जलस्त्रोत दूषित असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. यानंतर नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत दरवर्षी ग्रामीण व शहरी भागातील पाणी नमुन्यांची तपासणी केली जाते. ज्या गावातील पाणी नमुने दूषित आढळतात, त्या ग्रामपंचायतींना पत्र देऊन साथरोग टाळण्यासाठी उपाययोजना सुचविल्या जातात. तसेच दूषित पाण्याच्या प्रमाणात वाढ होणार नाही, यासाठी खबरदारी घेतली जाते. यावर्षी पावसाळा सुरू होताच आरोग्य विभागाने जून महिन्यात जिल्ह्यातील ३९ आरोग्य केंद्रामार्फत १ हजार ९३१ तर शहरी विभागातील ५७७ अशा २ हजार ५०८ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात ग्रामीण विभागात १०३ गावातील २३६ व शहरी विभागातील ६३ असे २९९ पाणी नमुने दूषित असल्याचे निष्पन्न झाले आहेत. याची टक्केवारी ११.९२ एवढी आहे.
पावसामुळे दूषित पाणी वाहून आल्याने जलजन्य साथरोगांचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. अशा परिस्थितीत नागरिकांनी पाणी शुद्ध करुनच प्यावे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, परिसर स्वच्छ ठेवावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.
मात्र ज्या गावात पाणी शुद्धीकरणासाठी कोणते यंत्रच उपलब्ध नाही, अशा गावातील नागरिकांना उपलब्ध पाणी स्त्रोतावरच आपली तहान भागवावी लागत आहे. जिवती तालुक्यातील अनेक गावांपर्यंत जिल्हा परिषदेची पाणी पुरवठा योजनाच पोहचली नसल्यामुळे खड्डा खोदून त्यातील पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. याचीही तपासणीही करण्याची गरज आहे.
या गावांमधील पाणी दूषित
चंद्रपूर तालुक्यातील लोहारा, मामला, हळदी, नुदूर, पिंपळखुट, वायगाव, निंबाळा, चोरगाव, ऊर्जानगर, वडा, धानोरा, पिपरी, उसगाव, सिदूर, मारडा, नकोडा, बल्लारपूर तालुक्यातील विसापूर, कळमना, कोर्टीमक्ता, जुनीदहेली, नवीदहेली, कवडजई, पळसगाव, वरोेरा तालुक्यातील वडगाव, जामगाव, बारव्हा, फत्तापूर, पिंपळगाव, मेसा, भद्रावती तालुक्यातील चेकबंराज, पिपरबोडी, पावना रै, मोरवा, कढोली, देऊरवाडा, घोसरी, मुधोली, नागभीड तालुक्यातील सावरगाव, मेंढा, ब्रम्हपुरी तालुक्यातील अड्याळ जाणी, माहेर, नवेगाव, मेंडकी, तुलाना माल, पोंभुर्णा तालुक्यातील चेक ठाणेवासना, गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव, सिंदेवाही तालुक्यातील सरपडपार, मोहाडी, घोट, सावरगाव, सामदा, कच्चेपार, रत्नापूर, शिवणी, सावली तालुक्यातील आकापूर, बेलगाव, बोरमाळ, कसरगाव, व्याहाड बु., पारडी, मूल तालुक्यातील सुशी, आगडी, मणिपूर, अवर्शखेडा, हळदी गावमन्ना, चिचाळा, ताडाळा, कोसंबी, बेंबाळ, नवेगाव, भु., नांदगाव, चिमूर तालुक्यातील सोनगाव बन, पेठ भांसुली, खडसंगी, भिवापूर, नवेगाव, वडाळा पैकू, नवेगाव, भिसी, चक जांभुळ, मासळ, कोलारा, मानेमोहाडी, सातारा, बामणगाव, राजुरा तालुक्यातील चिंचोली, गोवरी, रामनगर, धोपटाळा, धिडसी, देवाडा, साखरवाही, खामोना, जिवती तालुक्यातील कामतगुडा, मरकागोंदी, सलीमनगर, कोरपना तालुक्यातील हिरापूर, विरूर, शेरज आदी गावांचा समावेश आहे.
दूषित पाणी आढळलेल्या गावांमध्ये आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू आहेत. पावसामुळे जलजन्य आजार उद्भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी पाणी उखळूनच प्यावे. आरोग्याबाबत सर्तक राहून पसिरात स्वच्छता ठेवावी.
- डॉ. श्रीराम गोगुलवार
जिल्हा आरोग्य अधिकारी