तरंगत्या सौर प्रकल्पातून होणार १०५ मेगावॅट वीजनिर्मिती, मुख्य अभियंता कुमारवार यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 01:50 PM2023-08-14T13:50:50+5:302023-08-14T13:52:58+5:30

सीटीपीएसमध्ये सौर प्रकल्प : प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना

105 MW power generation will be done from the floating solar project, Information of Chief Engineer | तरंगत्या सौर प्रकल्पातून होणार १०५ मेगावॅट वीजनिर्मिती, मुख्य अभियंता कुमारवार यांची माहिती

तरंगत्या सौर प्रकल्पातून होणार १०५ मेगावॅट वीजनिर्मिती, मुख्य अभियंता कुमारवार यांची माहिती

googlenewsNext

चंद्रपूर : चंद्रपुरातील इरई धरणाच्या पाण्यावर महाजेनकोचा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प लवकरच साकार होणार आहे. या प्रकल्पाची रचना तयार करण्यात आली असून, निविदा प्रक्रिया सुरू आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यानंतर १०५ मेगावॅट विजेचे उत्पादन शक्य होणार आहे.

चंद्रपूरवीजनिर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता गिरीश कुमारवार यांनी यासंदर्भात माहिती दिली. चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राची एकूण उत्पादन क्षमता २ हजार ९२० मेगावॅट असून, राज्यातील औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या एकूण विजेच्या ३० टक्क्यांहून अधिक या वीज केंद्राचा वाटा असल्याचेही कुमारवार म्हणाले. प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

६०० मेगावॅटचा सुपर क्रिटिकल पॉवर युनिट उभारणार

पर्यावरणाच्या समस्यांमुळे या प्लांटचे २ युनिट आधीच बंद पडले आहेत. ३ आणि ४ युनिटचे वयही ३५ वर्षांपेक्षा जास्त झाले आहे. राज्यातील विजेची मागणी लक्षात घेऊन ते सुरू करण्यात येत आहे. आधुनिक उपकरणे त्यामध्ये स्थापित केले जात आहेत जेणेकरून जुन्या युनिट्समधून कोणतेही प्रदूषण होणार नाही. या पॉवरहाऊसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानासह ६०० मेगावॅट क्षमतेचे सुपर क्रिटिकल पॉवर युनिट उभारण्याचा प्रस्ताव असून, भविष्यात हा प्रकल्पही राबविला जाणार आहे.

राखेबाबत सिमेंट उद्योगांशी करार

या प्लांटमध्ये वीजनिर्मितीसाठी दररोज ४५ हजार मेट्रिक टन कोळशाचा वापर होतो. या कोळशातून सुमारे ३५ टक्के राख निघते. या राखेचा १०० टक्के पुनर्वापर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. सध्या ४५ टक्के राख जमा झाली आहे. ही राख राज्यातील विविध उद्योगांना दिली जात आहे. सिमेंट उद्योगांना या राखेची सर्वाधिक गरज आहे. वीजनिर्मिती केंद्र व्यवस्थापनाने अंबुजा, अल्ट्राटेक आणि एसीसीसारख्या सिमेंट उद्योगांशी करार केला आहे. ही राख भूमिगत कोळसा खाणींमध्येही वापरली जात आहे.

पाणी पुनर्वापरावर भर

सीटीपीएसद्वारे वीजनिर्मितीसाठी वापरले जाणारे पाणी हे महाजेनकोच्या इरई धरणातून घेतले जाते. या धरणातून चंद्रपूर शहरालाही पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी सीटीपीएस व्यवस्थापन कमीत कमी पाण्याचा वापर करीत आहे, असे त्यांनी सांगितले. यासाठी पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी महाजेनको आणि महापालिका संयुक्त प्रयत्न करत आहेत.

मलनिस्सारण प्रकल्प अंतिम टप्प्यात

चंद्रपूर शहरातून बाहेर पडणाऱ्या घाण पाण्यावर प्रक्रिया करून ते पॉवर हाऊसमध्ये वापरण्यासाठी आणले जात आहे. त्यासाठी शहरात मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आले आहेत. शहरातून सीटीपीएसपर्यंत पाइपलाइन टाकण्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. हे काम एक-दोन महिन्यांत पूर्ण होईल. या योजनेंतर्गत सीटीपीएसमधून चंद्रपूर शहराला दररोज ५० एमएलडी पाणी मिळणे अपेक्षित आहे.

Web Title: 105 MW power generation will be done from the floating solar project, Information of Chief Engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.