दहावीची परीक्षा रद्द; परंतु शुल्क कधी परत करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:29 AM2021-05-18T04:29:06+5:302021-05-18T04:29:06+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणेच्या वतीने इयत्ता दहावीची परीक्षा मार्च महिन्यात आयाेजित केली हाेती. यंदा ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणेच्या वतीने इयत्ता दहावीची परीक्षा मार्च महिन्यात आयाेजित केली हाेती. यंदा चंद्रपूर जिल्ह्यात १७ हजार २२६ मुले व १३ हजार ८४ मुली दहावीमध्ये शिक्षण घेत होत्या. काेराेना महामारीच्या संकटामुळे यंदा शाळा पाहिजे त्या प्रमाणात भरल्या नाहीत. काही दिवस ५० टक्के उपस्थितीत शाळा भरल्या. त्यानंतर पुन्हा काेराेनाची दुसरी लाट आल्याने शासनाने प्रत्यक्ष वर्ग बंद केले. पुन्हा ऑनलाइन अध्ययन, अध्यापन पद्धती अंमलात आणण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी ४२० रुपये परीक्षा शुल्क भरले. परंतु, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बाेर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी ओळखावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षण विभागाकडून सामाईक परीक्षा (टीईटी) घेण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. मात्र अद्यापही कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही.
परीक्षाच रद्द झाली आहे तर परीक्षा शुल्क परत दिल्यास लॉकडाऊनच्या आर्थिक संकटात मदत होईल, अशी अपेक्षा दहावीच्या विद्यार्थ्यांकडून होत आहे.
कोट
दहावीमध्ये १७ हजार २६८ मुले व १३ हजार ८४ मुली दहावीमध्ये शिक्षण घेत होत्या. यंदा दहावीची परीक्षा रद्द झाली आहे. परंतु, गुणवत्ता कशी ठरवायची यासाठी सामाईक परीक्षा घेण्यावर चर्चा सुरू आहे. यावर अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच परीक्षा शुल्कासंदर्भात कुठला निर्णय व तशा सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून आमच्या कार्यालयाला मिळालेल्या नाहीत.
- उल्हास नरड, शिक्षणाधिकारी, चंद्रपूर
-------
कोरोनामुळे यंदा आमची परीक्षा रद्द करण्यात आली. परीक्षेसाठी आम्ही शुल्क भरले होते. आता परीक्षाच होत नसल्याने परीक्षा शुल्क शासनाने परत करावे. ही रक्कम दुसऱ्या कामात उपयाेगात येऊ शकते.
- रागिणी उताणे, विद्यार्थिनी
------
पहिल्यांदाच ऑनलाइन शिक्षण देण्यात आले. काही अडचणी आल्या. परंतु, त्याचे निराकरण करीत अभ्यास केला. मात्र कोरोनाचे संकट वाढल्याने परीक्षा रद्द करण्यात आली. मात्र परीक्षा शुल्क परत देण्यात येणार की नाही, याबाबत माहिती नाही. शुल्क परत मिळाल्यास आधार होईल.
- पूजा जूनघरी, विद्यार्थिनी
------
परीक्षेची तयारी केली होती. मात्र परीक्षा रद्द झाली. आता पुन्हा सामाईक परीक्षा घेण्याचे कानावर येत आहे. परंतु, अभ्यासाची सवय तुटली आहे. परीक्षा होणार असेल तर त्याची लवकर माहिती देण्यात यावी, तयारी करण्यास सोपे जाईल.
- गौरव वाघमारे,
विद्यार्थी