चंद्रपुरात राजस्तरीय साहित्य संमेलन १० पासून; संमेलनाध्यक्षपदी राजन खान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 03:11 PM2018-02-05T15:11:44+5:302018-02-05T15:11:59+5:30
सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या वतीने स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयात १० ते ११ फे ब्रुवारीला दोन दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या वतीने स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयात १० ते ११ फे ब्रुवारीला दोन दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध कादंबरीकार राजन खान तर उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
स्वागताध्यक्षपदी तनुजा बोढाले तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, महापौर अंजली घोटेकर, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एन. कल्याणकर, ऐश्वर्य पाटकर, प्राचार्य डॉ.राजेश इंगोले आदी उपस्थित राहतील. उद्घाटन सत्रानंतर माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांच्या अध्यक्षतेखाली ‘आदिवासी साहित्य : चर्चा व चिंतन’ या विषयावर दुपारी चर्चासत्र होणार आहे. यामध्ये डॉ. प्रमोद मुनघाटे, डॉ. फु ला बागुल, डॉ. वैजनाथ अनमुलवाड, प्रभू राजगडकर, विद्या खडसे, सुमेधा श्रीरामे आदी विचार मांडतील. दुपारी ३ वाजता नव्वदोत्तरी ‘ग्रामीण व जनसाहित्य’ या चर्चा सत्रात डॉ. सुभाष सावरकर, मनोहर पाऊनकर, डॉ. सतीश तराळ, डॉ. निळकंठ मेंढे, डॉ. श्याम मोहोरकर, साखली तिखे, नीता कोंतमवार सहभागी होतील. चौथ्या सत्रात किशोर पाठक यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. रविवारी दुपारी १ वाजता ‘नव्वदोत्तरी आंबेडकरी साहित्य’ या चर्चासत्रात डॉ. इसादास भडके, डॉ. मंगेश गुलवाडे, विनोद दत्तात्रय, डॉ. आरती कुलकर्णी, डॉ. भास्कर पाटील, डॉ.प्रकाश राठोड, सुरेश रामटेके आदी भूमिका मांडणार आहेत. संमेलनादरम्यान कवितासंग्रहाचे प्रकाशन होणार आहे, अशी माहिती सूर्यांशचे इरफान शेख, माजी नगरसेवक संजय वैद्य, डॉ. विद्याधर बन्सोड, ना. गो. थुटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.