11 लाख 94 हजार नागरिक आरोग्याबाबत बेफिकिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2022 11:18 PM2022-09-16T23:18:07+5:302022-09-16T23:19:55+5:30
कोरोनापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाने मोफत डोस देण्याची मोहीम सुरू केली. ही मोहीम आता ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपणार आहे. त्यानंतर मात्र नागरिकांना खासगी रुग्णालयात ४०० रुपये देऊन प्रिकॉशन डोस घ्यावा लागेल. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी शासकीय संस्थेतून त्वरित मोफत प्रिकॉशन डोस घेऊन स्वत:ला सुरक्षित करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने आता शेवटची संधी दिली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ‘कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सव’ अंतर्गत १५ जुलै ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीत नागरिकांना मोफत प्रीकॉशन डोस देणे सुरू आहे. मात्र, अजूनही ११ लाख ९४ हजार ३० नागरिकांचा प्रिकॉशन डोस घेतला नाही. मोफत डोससाठी आता केवळ १४ दिवस शिल्लक राहिल्याने नागरिकांनी तातडीने डोस घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
कोरोनापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाने मोफत डोस देण्याची मोहीम सुरू केली. ही मोहीम आता ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपणार आहे. त्यानंतर मात्र नागरिकांना खासगी रुग्णालयात ४०० रुपये देऊन प्रिकॉशन डोस घ्यावा लागेल. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी शासकीय संस्थेतून त्वरित मोफत प्रिकॉशन डोस घेऊन स्वत:ला सुरक्षित करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने आता शेवटची संधी दिली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध आहे. मात्र, सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे नागरिक बिनधास्त झाले आहे; परंतु कोरोनाचे दीर्घकालीन परिणाम लक्षात घेता प्रिकॉशन डोस घेणे अत्यंत आवश्यक आहे.
कोण घेऊ शकतात प्रिकॉशन डोस ?
- प्रिकॉशन डोससाठी १८ वर्षांवरील नागरिकांनी त्यांच्या कोविड लसीच्या दुसऱ्या डोसनंतर ६ महिने किंवा २६ आठवड्यांचा कालावधी पूर्ण केलेला असावा. जिल्ह्यात प्रिकॉशन डोससाठी पात्र लाभार्थ्यांची संख्या १३ लाख ७३ हजार १९२ आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ७९ हजार १६२ लाभार्थ्यांनी प्रिकॉशन डोस घेतला असून ही टक्केवारी १३.०५ आहे. अजुनही ११ लाख ९४ हजार ३० नागरिकांनी प्रिकॉशन डोस घेतला नाही.