४२२१ जागांसाठी ११ हजार ३६४ उमेदवार निवडणूक रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:33 AM2021-01-08T05:33:42+5:302021-01-08T05:33:42+5:30
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्हयात १२ हजार ३८७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. छाननीनंतर ...
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्हयात १२ हजार ३८७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. छाननीनंतर १२ हजार २६१ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. सोमवारी रात्री ११ वाजतापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत वाढवून दिली. त्यामुळे जिल्ह्यातील १५ तहसील कार्यालयात रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया पूर्ण झाली. २० ग्रामपंचायतींमध्ये माघारीच्या जागेवर एकच अर्ज राहिला. निवडणुकीवर बहिष्कार टाकलेले घुग्घुस व ग्रामपंचायतींमध्ये ४५ जागांवर कुणीही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने रिक्त ठेवण्यात आल्या. आता ६०९ ग्रामपंचायतींमध्ये ४ हजार २२१ जागांसाठी ११ हजार ३६४ उमेदवार रिंगणात आहेत.
अविरोध ठरलेल्या २० ग्रामपंचायती
जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींमध्ये ८७७ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत एकही अर्ज आले नाही. त्यामुळे ८७७ उमेदवार अविरोध ठरले. यामध्ये कोरपना तालुक्यात शिरजखुर्द, गोंडपिपरी, मूलमध्ये राजगड, उथळपेठ, ब्रम्हपुरीमध्ये किन्ही, बोडधा, सिेदेवाहीत सामदा खुर्द, सावलीमध्ये खेळी, चिमूर, नागभीडमध्ये मेंढा व मांगरूढ, वरोरा तालुक्यात आनंदवन, बोरगाव मो. गुंजाळा, खेमजई- येवती, भद्रावती तालुक्यातील तीन अशा २० ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
१९० निवडणूक चिन्हांचे वाटप
मागील पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने ४८ निवडणूक चिन्हांचा पर्याय उपलब्ध करून दिला होता. यंदाच्या निवडणुकीत तब्बल १९० चिन्हांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर मंगळवारी उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले. यासाठी रिंगणातील उमेदवारांना पसंतीक्रम ठरविण्याची मूभा देण्यात आली.
ग्रामीण भागात प्रचाराची रणधुमाळी
निवडणूक प्रचारासाठी एक आठवडा मिळणार आहे. उमेदवार निश्चित झाल्याने ग्रामीण भागात आता प्रचाराची रणधुमाळी रंगणार आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते व समर्थकाच्या गावागावांतील भेटीला वेग येणार आहे.
१५ जानेवारीला मतदान
येत्या १५ जानेवारी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने मतदार यादी अपडेट करण्याची मोहीम पूर्ण केली. कोरोनाच्या सावटातच ही निवडणूक होणार असल्याने आरोग्य विभागाकडेही मोठी जबाबदारी देण्यात आली. प्रचारासाठी बाहेर निघणारे उमेदवार व कार्यकर्ते यांचीही कोरोना चाचणी करण्यासाठी पथक गठित केले जाणार आहे.