भद्रावती, वरोरा तालुक्यात होणार ११,७६० क्विंटल मोफत धान्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:26 AM2021-05-01T04:26:47+5:302021-05-01T04:26:47+5:30
भद्रावती : कोरोना काळात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांचे व्यवहार ठप्प पडून त्यांचे जीवन जगणे असह्य झाले आहे. अशा ...
भद्रावती : कोरोना काळात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांचे व्यवहार ठप्प पडून त्यांचे जीवन जगणे असह्य झाले आहे. अशा स्थितीत त्यांना दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी राज्य शासनातर्फे मुख्यमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा योजनेची लक्ष्य निर्धारित सार्वजनिक व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचे वितरण करण्यात येणार आहे.
भद्रावती तालुक्यात गव्हाचे २,९४० क्विंटल तर तांदूळ १,४७० क्विंटल, वरोरा तालुक्यात गहू ४,२०१ क्विंटल तर तांदळाचे ३,१५० क्विंटल मोफत वाटप होणार आहे. याशिवाय भद्रावती येथ १५० थाळी तर वरोरा येथे ३०० थाळींचे मोफत वितरण होणार असून नागरिकांना कोरोना काळात मोठा दिलासा मिळणार आहे.
पात्र लाभार्थ्यांना तांदूळ, गव्हाचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. यात अंतोदय रेशनकार्ड धारकास प्रति कार्ड १५ किलो गहू व २० किलो तांदूळ, असे ३५ किलो धान्य वितरित करण्यात येणार आहे. तर प्राधान्य गट योजनेंतर्गत प्रति व्यक्ती पाच किलो धान्य यात तीन किलो गहू व दोन किलो तांदळाचे वितरण करण्यात येणार आहे. भद्रावती व वरोरा तालुक्यात एकूण ११ हजार ७६० क्विंटल धान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. गरजू व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी केले आहे.