१२ कोटींच्या घोळाचा ताडोबातील ऑनलाइन बुकिंगला फटका; संकेतस्थळ बंद करण्याचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 11:02 AM2023-08-30T11:02:47+5:302023-08-30T11:05:35+5:30
कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
चंद्रपूर : ताडोबातील १२ कोटींच्या घोळाने ऑनलाइन सफारी बुकिंग बंद करण्यात आले. त्यामुळे ताडोबा व्यवस्थापनाला मोठा आर्थिक फटका असला आहे.
ताडोबा प्रशासनाने ऑनलाइन तिकीट बुकींचे कंत्राट वाइल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन या एजन्सीला दिले होते. २०२१ ते २०२३ या वर्षाचे अंकेक्षण झाले असता त्यात २२ कोटी ८० लाख ६७ हजार ७४९ रुपयांची तफावत आढळली. याबाबत एजन्सीला पैसे भरण्यास सांगितले असता त्यांनी १० कोटी रुपये भरले. मात्र, उर्वरित रक्कम भरण्यास नकार दिला. त्यामुळे ताडोबा व्यवस्थापाने एजन्सीचे संचालक अभिषेक विनोदकुमार ठाकूर व रोहित विनोदकुमार ठाकूर यांच्यावर वनाधिकारी सचिन शिंदे यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकरण न्यायालयात...
वाइल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन एजन्सीने माय ताडोबा नावाचे संकेतस्थळ तयार करून ताडोबा सफारीसाठी सेवा पुरवीत होती. मात्र, १२ कोटींच्या घोळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने हे संकेतस्थळ बंद करण्याचा आदेश काढला. याविरुद्ध ठाकूर बंधूंनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने ताडोबा व्यवस्थापनाच्या आदेशाला स्थगिती देत हा निर्णय चंद्रपूर न्यायालयांतर्गत घेण्यात यावा, असे नमूद केले व जोपर्यंत निर्णय लागणार नाही तोपर्यंत ऑनलाइन बुकिंग बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.