वाघाची झलक पाहण्यासाठी तब्बल १२ तास छतावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 05:00 AM2020-07-15T05:00:00+5:302020-07-15T05:00:53+5:30
सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास लोनवाही येथील सहकारी राईस मील परिसरात एक वाघ आला. त्या वाघाने चालकाला जखमी केली. ही घटना वाऱ्यासारखी सिंदेवाही शहरात पसरली. वाघाला बघण्यासाठी सिंदेवाहीकरांनी थेट घटनास्थळाकडे धाव घेतली. वाघ राईसमीलच्या मागील बाजुला असलेल्या जंगलात दडून बसला असल्यामुळे तो कुणालाही दिसत नव्हता. यानंतर वनविभागाचे वेगवेगळे पथक दाखल झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : वाघांचा जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. तरीही त्याची एक झलक बघण्याची संधी मिळाली तर कितीही वेळ वाट बघण्याची तयारी असते. वाघाच्या एक झलकसाठी तब्बल सकाळी ७.३० वाजतापासून हजारो नागरिक घरांच्या छतावर चढून होते. १२ तास उलटले तरीही वाघ दिसला नाही. सूर्य मावळतीला गेला तरी कुणीही जागा सोडली नाही. अखेर वाघ जेरबंद झाला. तरीही वाघाचे दर्शन घेता आले नाही. तो बघता आला नाही. याचा प्रत्यय मंगळवारी सिंदेवाहीकरांना आला. कोरोनाच्या दहशतीतही सिंदेवाहीत दिवसभर या वाघाचीच चर्चा होती.
सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास लोनवाही येथील सहकारी राईस मील परिसरात एक वाघ आला. त्या वाघाने चालकाला जखमी केली. ही घटना वाऱ्यासारखी सिंदेवाही शहरात पसरली. वाघाला बघण्यासाठी सिंदेवाहीकरांनी थेट घटनास्थळाकडे धाव घेतली. वाघ राईसमीलच्या मागील बाजुला असलेल्या जंगलात दडून बसला असल्यामुळे तो कुणालाही दिसत नव्हता. यानंतर वनविभागाचे वेगवेगळे पथक दाखल झाले. त्यांच्याकडून वाघाचा शोध सुरू झाला. अशातच वाघ बाहेर येईल आणि पुन्हा तो कुणावर हल्ला करेल, या भीतीने गर्दीने सुरक्षित जागा निवडली ती म्हणजे पसिरातील घरांचे छत. घटनास्थळ परिसरातील प्रत्येक घराच्या छतावर माणसांचीच गर्दी दिसत होती. दुसरीकडे वनविभागाची चमू वाघाला जेरबंद करण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात व्यस्त होती. वाघ वनविभागाला हुलकावणी देत होता.
वाघालाही बाहेर पडण्यासाठी दुसरा मार्ग नसल्यामुळे अखेर रात्री ७ वाजताच्या सुमारास त्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात यश आले. तब्बल साडेअकरा तासानंतर वाघाचा थरार थांबला. वनविभागाने सुटकेचा श्वास घेतला.
वाघाची एक झलक बघण्यासाठी जमलेल्या नागरिकांचा मात्र हिरमोड झाला. परिसर सील असल्यामुळे कुणालाही आत जावून प्रत्यक्ष वाघ बघता आले नाही. ही सल मनात ठेवून नागरिक खाली उतरले. वाघाची चर्चा करीतच घरी परतले.