चोरट्यांकडून १२ मोटारसायकली जप्त
By admin | Published: October 4, 2015 01:53 AM2015-10-04T01:53:54+5:302015-10-04T01:53:54+5:30
चंद्रपूर शहर पोलिसांनी २९ सप्टेंबरला अटक केलेल्या दोन भावंडांकडून १२ दुचाकी वाहने जप्त केली असून अजून काही चोरीतील मोटारसायकल पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
एक होता तडीपार : भावाच्या मदतीने सुरू होती चोरी
चंद्रपूर: चंद्रपूर शहर पोलिसांनी २९ सप्टेंबरला अटक केलेल्या दोन भावंडांकडून १२ दुचाकी वाहने जप्त केली असून अजून काही चोरीतील मोटारसायकल पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकल चंद्रपूर, बल्लारशाह, राजुरा, नागपूर येथून चोरण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी व ठाणेदार सुनिल ताजने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंदरे, पोलीस उपनिरीक्षक विवेक देशमुख, जमादार खेमेकर, नायक पोलीस शिपायी संजय आतकुलवार, स्वामीदास चालेकर, लवली शर्मा, उमेश वाघमारे, अफसर खान पठाण, किशोर तुमराम व डी.बी.पथकातील कर्मचाऱ्यांनी २९ सप्टेंबरला चंद्रपुरातील रहिवासी असलेल्या प्रशांत झाडे व त्याचा भाऊ प्रतिक झाडे या दोघांना अटक केली होती. यातील प्रतिक झाडे हा तडीपार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तो गेल्या काही महिन्यांपासून त्याचा भाऊ प्रशांत झाडे याच्या मदतीने चंद्रपूर शहरासह बल्लारपूर, राजुरा नागपूर येथून अनेक दुचाकींची चोरी केली. त्याची कबुलीही या चोरट्यांनी पोलिसांपुढे दिली आहे.
गेल्या पाच दिवसांत पोलिसांनी केलेल्या चौकशीत नागपूर येथून चोरलेली पॅशन प्रो (एम.एच.३४-एस३०३४), हिरोहोंडा सीबी झेड (एम.एच.३४-२७४५), एक विना क्रमांकाची पल्सर मोटारसायकल, नागपूर येथून चोरलेली बुलेट (०८८८), काळ्या रंगाची करिश्मा झेड, नागपूर येथून चोरलेली प्लेझर मोपेड (एम.एच-४० यू ४५२८), नागपूर येथून चोरलेली हिरोहोन्डा स्प्लेंडर, राजुरा येथून चोरलेली यामाहा मोटारसायकल, चंद्रपूर येथून चोरलेली बुलेट मोटारसायकल, चंद्रपूर येथील घुटकाळा परिसरातून चोरलेली करिष्मा मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे.
या प्रकरणात आरोपींविरुद्ध भादंवि ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात मोटारसायकल लंपास करण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. त्याच्या तक्रारीही पोलीस ठाण्यात झाल्यात. (प्रतिनिधी)