१२ हजार हेक्टर क्षेत्राला मिळाले सिंचन

By admin | Published: September 26, 2016 01:16 AM2016-09-26T01:16:55+5:302016-09-26T01:16:55+5:30

राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानाने चंद्रपूर जिल्ह्यातही आशादायक चित्र निर्माण केले आहे.

12 thousand hectare area got irrigation | १२ हजार हेक्टर क्षेत्राला मिळाले सिंचन

१२ हजार हेक्टर क्षेत्राला मिळाले सिंचन

Next

जलयुक्त शिवार अभियान : ३२ उपाययोजनांद्वारे सिंचनवाढ
चंद्रपूर : राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानाने चंद्रपूर जिल्ह्यातही आशादायक चित्र निर्माण केले आहे. या अभियानातून तब्बल १२ हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आली आहे. राज्याच्या कृषी विभागाने जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये ३२ प्रकारच्या उपाययोजना केल्या. त्यामुळे यावर्षीच्या पावसाचे पाणी जमा होऊन शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. याशिवाय अभियानामुळे अतिरिक्त पाणीसाठा निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात १९७७ दगडी बंधारे घालण्यात आले आहेत. त्यातून १०५ टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला. १३६० गॅबियन स्ट्रक्चरचे काम करण्यात आले आहे. त्याकरिता १ कोटी १२ लाख ८३ हजार रुपये खर्च करण्यात आले. सहा ठिकाणी माती नाला बांध घालण्यात आले आहेत. त्यातून ४४.८६ टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा निर्माण होऊन २० हेक्टर जमिनीला सिंचन करणे शक्य झाले. ३२ माती नालाबांधाची दुरूस्ती करून १०२ हेक्टरचे सिंचन करण्यात आले. या अभियानात १२ हजार ३६६ हेक्टरवर ३१२ ढाळीच्या बांधांची कामे करण्यात आली आहेत. त्यापैकी ७९६४ हेक्टर क्षेत्रातील कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यातून १०२५.७५ हेक्टर क्षेत्रामध्ये सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. ७७० बोडींचे नूतनीकरण व खोलीकरण करण्यात येत असून ७५२ कामे पूर्ण झाली आहे. त्यामुळे ६५३.६२ टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा निर्माण झाला. या बोडींमुळे ३९८.३५ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. १३ साठवण बंधाऱ्यांची कामे घेण्यात आली. त्यामुळे ४४७.२६ टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा तयार झाला. या पाण्यातून ८९४.५२ हेक्टर जमिनीला सिंचन सुविधा उपलब्ध झाली आहे. ३३२ सिमेंट नाल्याच्या बांधामुळे १३८७.३९ हेक्टरला सिंचन झाले. १७८ तलावाच्या खोलीकरणातून ९५४.३ हेक्टर क्षेत्राचे सिंचन करणे शक्य झाले. याशिवाय कोल्हापुरी बंधारे, विहिरींचे पुनर्भरण, तुषार सिंंचन-ठिबक सिंचनाची कामे, उपसा सिंचन योजना, लघु पाटबंधारे पाझर तलाव दुरूस्ती, कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरूस्ती आदी कामे करण्यात आली आहेत.

सर्वाधिक २०२० शेततळ्यांची कामे
जिल्ह्यात सर्वाधिक कामे शेततळ्यांची करण्यात आली आहे. तब्बल २ हजार २० शेततळ्यांचे नियोजन करण्यात आले. त्यापैकी १७६१ शेततळ्यांचे काम सुरू करून १७१३ शेततळी पूर्ण झाली आहेत. ४८ शेततळ्यांची कामे सुरू आहेत. शेततळ्यांच्या माध्यमातून २२६२.४७ टीएमसी पाणीसाठा निर्माण झाल्याचा अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे. त्यातून १ हजार ७६ हेक्टर शेतीला सिंचन उपलब्ध झाले आहे. या सर्व कामांवर आतापर्यंत १२ कोटी ८८ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
गाळ काढल्यामुळे सर्वाधिक सिंचन
जलयुक्त शिवार योजनेत कृषी विभागाने ३२१ गाळ काढण्याची कामांपैकी ३०५ कामे पूर्ण झाली आहे. त्यामुळे तब्बल २६०४.१९ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आहे. त्याखालोखाल मजगी वा भातखाचऱ्यांच्या कामांमुळे सिंंचन निर्माण झाले आहे. ही ५४७ कामे सुरू करण्यात आली. त्यापैकी ५५२ मजगीची कामे पूर्ण झाली आहेत. मजगी करण्यासाठी ७ कोटी ६८ लाख ७६ हजार रुपये खर्च करण्यात आले. त्या माध्यमातून तब्बल २४९०.२९ टीएमसी पाणीसाठा तयार करणे शक्य झाले. परिणामती १८७१.८९ हेक्टर जमीन सिंचन क्षेत्राखाली आली आहे. २७५ मजगींचे पुनरूज्जीवन करण्यात आले. गेल्या वर्षीची शिल्लक कामे धरून ३११ मजगींचे पुनरूज्जीवन करणे शक्य झाले. त्याद्वारे ५३१.८९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.

Web Title: 12 thousand hectare area got irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.