बल्लारपुरात घरगुती कचऱ्यापासून तयार केले१२ टन सेंद्रीय खत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 11:37 AM2017-12-23T11:37:56+5:302017-12-23T11:39:02+5:30
शहरात संकलित केलेल्या ओला व सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन बल्लारपूर नगर परिषदेने १२ टन सेंद्रीय खत तयार केले आहे.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर: शहरात संकलित केलेल्या ओला व सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन बल्लारपूर नगर परिषदेने १२ टन सेंद्रीय खत तयार केले आहे. हे खत विकले जात आहे व शेतकरी शेतीकरिता खरेदी करुन नेत आहेत. शहरातून दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निघतो. पूर्वी त्याला जाळून टाकले जात होते किंवा जमिनीत दडपले जात असे. परंतु, गेल्या काही वर्षापासून ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करुन त्यावर प्रक्रिया करणे सुरु केले व कचऱ्यापासून खत तयार करण्याची जबाबदारी नगर पालिकेने बालाजी एग्रीटेकला दिली. या कचऱ्यापासून १२ टन खत तयार झाले आहे. बल्लारपूर नगरपालिकेने या खताची माहिती लोकांना व्हावी, याकरिता रविवारी आठवडी बाजारात खत प्रदर्शन आणि विक्रीचे मंडप उभारले. यात शेतकरी बंधूंनी हजेरी लावून ते खत खरेदी केले. याप्रसंगी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष हरीश शर्मा, उपाध्यक्ष मीना चौधरी, मुख्याधिकारी विपीन मुद्धा, सभापती जयश्री मोहुर्ले, सभापती सूवर्णा भटारकर, पूनम निरांजने, नगर सेवक सिक्की यादव, स्वामी रायबरम, मीना बहुरिया उपस्थित होते. ओला व सुका कचरा व्यवस्थितपणे व काळजीने संकलित करणाऱ्या न.प.च्या दहा सफाई कर्मचाऱ्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. तसेच, शहरातील कचरा वेचकाचा स्वच्छ भारत अभियानात समावेश करुन त्यांना नगर परिषदेकडून ओळखपत्र व संरक्षक जॅकेट देण्यात आले.