१२ गावे अजूनही तहानलेलीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 10:38 PM2019-02-19T22:38:02+5:302019-02-19T22:38:28+5:30
जनतेच्या पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी सन २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील ८९ गावे शासनाने टंचाईग्रस्त यादीत समाविष्ट केले. त्यात सावली तालुक्यातील १२ गावांचा समावेश होता. त्याकरिता निधी मंजूर झाला. परंतु, घोषणा झाल्यानंतर बराच कालावधी लोटला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
उपरी : जनतेच्या पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी सन २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील ८९ गावे शासनाने टंचाईग्रस्त यादीत समाविष्ट केले. त्यात सावली तालुक्यातील १२ गावांचा समावेश होता. त्याकरिता निधी मंजूर झाला. परंतु, घोषणा झाल्यानंतर बराच कालावधी लोटला आहे. परंतु, तालुक्यातील एकाही गावात कमाला प्रारंभ झाला नसून स्थानिक सरपंचासह जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे.
जनसामान्यांचे समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यात पिण्याच्या पाण्याची समस्या सावली तालुक्यात बिकट असून ती समस्या मार्गी लावण्याच्या दृष्टीने सन २०१८-१९ वर्षात शासनाने राष्ट्रीय कृत्रीम पेयजल योजनेंतर्गत जिल्ह्यातील पाणी टंचाई ग्रस्त यादीत सावली तालुक्यातील कढोली, डोनाडा, पांढरसराड आकापूर, सायखेडा, डोंगरगाव मस्के, जाम बूज, करगावचक, विहीरगाव, उसेगाव, बोरमाडा, बेलगाव अशी १२ गावे समाविष्ट केली आहेत.
सदर गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सात कोटी ७८ लाख रुपये शासनांकडून मंजूर झाल्याची माहिती आहे. मात्र उन्हाळ्याची सुरुवात झाली असूनही सावली तालुक्यातील कुठेच या योजनेचा प्रारंभ झाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासनाच्या भुमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.