ताडोबाच्या १२.१५ कोटींच्या घोटाळ्यात आता ईडीची एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 11:43 AM2024-05-04T11:43:18+5:302024-05-04T11:45:24+5:30
Chandrapur : मनी लाँड्रिंगच्या संशयातून तपास
चंद्रपूर :ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये ताडोबा सफारीच्या बुकिंगसाठी करार केलेल्या वाइल्ड कनेक्टिविटी सोल्युशन्स (डब्ल्यूसीएस) कंपनीने ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची १२.१५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या विनंतीनुसार ईडीने उडी घेतली असून या मनी लॉड्रिंगच्या संशयातून तपास होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी डब्ल्यूसीएस कंपनीचे संचालक अभिषेक सिंह ठाकूर व रोहित सिंह ठाकूर यांना अटक केली होती. ईडीने यासंदर्भात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वन संरक्षक जितेंद्र रामगावकर यांच्याकडून घोटाळ्याच्या संदर्भात माहिती घेण्यात आल्यानंतर विभागातील ऑडिटमधील दस्तऐवज तसेच चंद्रपूर रामनगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्याचा तपास करणारे आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष म्हसके यांच्याकडूनसुद्धा प्रकरणाची कागदपत्र मागितले असल्याची माहिती आहे. डब्ल्यूसीएसच्या कंपनीच्या विरोधात १८ ऑगस्ट २०२३ ला ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या विभागीय वनाधिकाऱ्यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. दरम्यान, ठाकूर बंधू फरार झाले होते. मात्र, त्यांना पोलिसांनी अटक केली होती.
गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता
आता या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वन संरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी ईडीला चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ईडीने एंट्री केल्याने तसेच मनी लॉड्रिगची तपासणी सुरू होणार असल्याने हे प्रकरण गंभीर झाले असून
यहोवा राष्ट्रीय कान गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वन संरक्षक जितेंद रामगावकर यांच्याशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही.