१२,४५० खातेदार तरीही एटीएम नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 05:00 AM2020-08-14T05:00:00+5:302020-08-14T05:00:55+5:30
सुभाष भटवलकर । लोकमत न्यूज नेटवर्क विसापूर : बल्लारपूर तालुक्यातीत सुमारे १२ हजार लोकसंख्या असलेल्या आणि परिसरातील ११ गावांचा ...
सुभाष भटवलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विसापूर : बल्लारपूर तालुक्यातीत सुमारे १२ हजार लोकसंख्या असलेल्या आणि परिसरातील ११ गावांचा संपर्क असलेल्या विसापूर येथे दोन बँका आहेत. मात्र, एटीएम सुविधा नसल्याने १२ हजार ४५० ग्राहकांची आर्थिक कोंडी होत आहे.
चंद्र्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या येथील शाखेत १५०० खातेधारक आहेत. त्यापैकी ४०० खातेधारकांकडे एटीएम कार्ड आहे. विसापूर नांदगाव सेवा सहकारी संस्थेच्या १२६ शेतकरी सभासदांना किसान क्रेडिट कार्डचे वितरण करण्यात आले. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत तब्बल १० हजार ९५० खातेधारक आहेत. त्यापैकी २ हजार खातेधारकांकडे एटीएम कार्ड आहे. शिवाय बल्लारपूर व चंद्रपूर येथील अन्य बँकांचे सुमारे ३ हजार एटीएम कार्डधारक विसापुरात राहतात. त्यांना सुट्टीच्या दिवशी किंवा रात्री पैशाची गरज भासल्यास चंद्र्रपूर किंवा बल्लारपूर शहरात जाण्याशिवाय अन्य मार्ग नाही.
त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागते. शेतकऱ्यांना पैसे काढण्यासाठी सगळी कामे सोडून शहरात जावे लागते. यामुळे विनाकारण वेळ व पैसा वाया जात आहे.
त्याकडे बँकांनी विसापूर येथे एटीएम सुरू करणे आता काळाची गरज झाली आहे. समस्येच्या अनुषंगाने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विसापूर शाखेचे व्यवस्थापक मनोज घिवे यांनी विचारणा केले असता एटीएमबाबत पाठपुरावा सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली.
सध्या कोरोनाचा कहर सुरू असल्यामुळे एटीएम मशीन लावणे शक्य नाही. परंतु बँकेची नाबार्ड पुरस्कृत मोबाईल एटीएम व्हॅन एटीएम खातेधारकांना बँकींग सेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विसापूर येथे लावण्यात येणार आहे.
- ए. एम. पोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्र्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूर