ताडोबा व्याघ्र प्रकल्पात बसविणार १,२५० कॅमेरे; वाघांची संख्या कळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2022 08:45 PM2022-06-28T20:45:48+5:302022-06-28T20:46:27+5:30
अखिल भारतीय व्याघ्र अंदाजाच्या चौथ्या टप्प्यांतर्गत ताडोबातील एक हजार ७५० चौरस किमी परिसरात पसरलेल्या १७० वन कक्षांमध्ये एक हजार २५० कॅमेरा ट्रॅप बसविले जात आहेत.
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने सर्वात मोठा कॅमेरा ट्रॅपिंगचा सराव हाती घेतला आहे. अखिल भारतीय व्याघ्र अंदाजाच्या चौथ्या टप्प्यांतर्गत एक हजार ७५० चौरस किमी परिसरात पसरलेल्या १७० वन कक्षांमध्ये एक हजार २५० कॅमेरा ट्रॅप बसविले जात आहेत. या कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपलेल्या प्रतिमांमधून व्याघ्र प्रकल्पात वाघांची नेमकी संख्या किती, हे जाणून घेण्याची अडचण आता दूर होणार आहे.
हा कॅमेरे ट्रॅपिंगचा सराव १ जूनपासून सुरू करण्यात आला. हे काम येत्या दोन-तीन दिवसांत पूर्ण होणार आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचा यात सहभाग आहे. विशेष म्हणजे अशी कामे शक्यतो एजन्सीद्वारा केली जातात. मात्र, ताडोबा व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने कॅमेरा ट्रॅप लावण्याची ही मोहीम वनविभागाकडून १०० टक्के राबविली जात आहे. मोहिमेसाठी उपसंचालक (कोअर) नंदकिशोर काळे, उपसंचालक (बफर) गुरुप्रसाद, एसीएफ कोअर महेश खोरे बापू येळे आदी मार्गदर्शन करीत आहेत.
मोहिमेत २०० कर्मचाऱ्यांचा सहभाग
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सुरू असलेल्या या मोहिमेत ६२५ ग्रिडमध्ये २०० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. वन्यजीव जीवशास्त्रज्ञ आणि वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचे प्रशिक्षण देऊन ताडोबा व्यवस्थापनाला तांत्रिक मार्गदर्शन करीत आहेत.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
अखिल भारतीय व्याघ्र अनुमानाचा हा चौथा आणि शेवटचा टप्पा आहे. ज्या ठिकाणी वाघांची हालचाल अपेक्षित आहे, त्या ठिकाणी २५ ते ३० दिवसांसाठी कॅमेरा ट्रॅप बसवले जातात. कॅमेरा ट्रॅप जोड्यांमध्ये बसवले जातात. जेणेकरून वाघाच्या शरीरावरील पट्टे दोन्ही बाजूंनी टिपता येतील.
कॅमेरा ट्रॅपिंग मोहिमेमुळे वाघांची ओळखसंख्या निश्चित होईल. कॅमेराबद्ध केलेल्या प्रतिमांवर सॉफ्टवेअरद्वारे प्रक्रिया केली जाते. यामुळे वनक्षेत्रातील वन्यप्राण्यांच्या हालचाली संपूर्णपणे उपलब्ध होईल.
- डॉ. जितेंद्र रामगावकर, क्षेत्र संचालक, ताडोबा व्याघ्र प्रकल्प