१३ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 12:28 AM2017-08-11T00:28:38+5:302017-08-11T00:29:16+5:30
मागील दोन दिवसांपूर्वी गोंडपिपरी पोलिसांनी कमलाबाई लाटकर यांच्या घरातून जोगापूर येथील हरमेलसिंग डांगी याचा १० लाख ८० हजारांचा अवैध दारूसाठा जप्त केला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी : मागील दोन दिवसांपूर्वी गोंडपिपरी पोलिसांनी कमलाबाई लाटकर यांच्या घरातून जोगापूर येथील हरमेलसिंग डांगी याचा १० लाख ८० हजारांचा अवैध दारूसाठा जप्त केला होता. या कारवाईला एक दिवस लोटत नाही तोच बुधवारी रात्री १० वाजतादरम्यान पोलिसांनी जोगापूर येथे पुन्हा धाड घालूून विठ्ठल वेलादी याच्या घरातून १२ लाख ९० हजारांचा विदेशी दारूसाठा जप्त केला. सदर दोन्ही कारवाईत हरमेलसिंग डांगी हाच आरोपी असून तो फरार असल्याची माहिती आहे.
गोंडपिपरी ठाण्यात नव्याने पदभार स्वीकारणारे ठाणेदार प्रविण बोरकुटे यांनी दारू तस्करांविरुद्ध चालविलेल्या धडक मोहिमेत सलग दोन दिवसात २३ लाखांचा दारूसाठा जप्त केला असल्यामुळे नागरिकांमध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे.
तालुक्यात दारूबंदी अमंलबजावणीनंतर अगदी राजरोसपणे दारु विक्रीचे प्रमाण वाढले होते. अशातच येथे कार्यरत तत्कालीन पोलीस अधिकाºयांना दारुविक्री व्यवसाय व तस्करांचे वाढते साम्राज्य हा विषय गांभीर्याने न घेतल्याने दिवसेंदिवस शहरातील सामाजिक स्वास्थ बिघडत चालले होते. तर काही विक्रेत्यांनी व तस्करांनी मैत्रीपूर्ण संबंध व साटेलोट्यातून दारु तस्करीचा व्यवसायात तेजी आणली होती. मात्र येथे नव्यानेच रुजू झालेले सहा. पोलीस निरीक्षक प्रविण बोरकुटे यांनी तत्कालीन पोलिस निरीक्षक यादव यांच्या बदलीनंतर ठाण्याची सूत्रे हाती घेत दारुविक्रेत्विरुद्ध धाडसत्र राबविलेले. यात ठाणा हद्दीत २३ तर एकट्या जोगापूरात सलग दोनदा घातलेल्या धाडीत तब्बल २४ लाखांचा विदेशी दारुसाठा जप्त करण्यात आला. अहेरी- चंद्रपूर मार्गालगत वसलेल्या जोगापूर गावात मागील काही दिवसांपासून अवैध दारु तस्करी व विक्रीला उद्याण आले होते. अशातच ८ व १० आॅगस्टच्या रात्री पोलिसांनी चालविलेल्या धाडसत्रात २४ लक्ष रुपयांची आजवरची विक्रमी कारवाई केल्याने तालुक्यातील अवैध दारुविक्रेते धास्तावले आहेत. या दोन्ही कारवाईतील आरोपी जोगापूर येथील हरमेलसिंग डांगी फरार आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकेर यांच्या आदेशानुसार एसडीपीओ देशमुख यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार बोरकुटे यांचे नेतृत्वात गोंडपिपरी पोलिसांनी केली.