१३ हजार १९७ मतदार ठरविणार बाजार समित्यांचे २१६ संचालक
By राजेश मडावी | Published: April 19, 2023 04:41 PM2023-04-19T16:41:04+5:302023-04-19T16:42:07+5:30
काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांची ताकद पणाला
चंद्रपूर : जिल्ह्यात १२ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २१६ संचालकपदासाठी १३ हजार १९७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. बाजार समित्यांवर वर्चस्व राहावे, यासाठी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व विविध पक्षांनी ताकद पणाला लावल्याचे दिसून येत आहे.
कोरपना, राजुरा, चंद्रपूर, वरोरा, चिमूर, नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, मूल बाजारात २८ एप्रिल तर गोंडपिंपरी, भद्रावती व पोंभुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या ३० एप्रिल रोजी होणार आहे. सहकार संघात ४५६, ग्रामपंचायत १९५, व्यापारी ७८ व मापारी संघातून ३४ असे एकूण ७६३ नामांकन दाखल झाले. दोन दशकांपासून सहकार क्षेत्रात काँग्रेसचे वर्चस्व आहे. भाजपने चंद्रपूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राकडे लक्ष दिले नाही. मात्र, केंद्र व राज्यातील सत्तेच्या जोरावर ग्रामपंचायत मतदारसंघातील मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहे.