दुर्गापूर वेकोलिच्या सिव्हरेज टँकमध्ये पडून बालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 12:45 PM2023-11-08T12:45:48+5:302023-11-08T12:46:34+5:30

संतप्त ग्रामस्थांनी मुलाचा मृतदेह नेला उपक्षेत्रीय प्रबंधकाच्या कार्यालयात

13 year old by dies after falling into sewage tank of Durgapur Vekoli | दुर्गापूर वेकोलिच्या सिव्हरेज टँकमध्ये पडून बालकाचा मृत्यू

दुर्गापूर वेकोलिच्या सिव्हरेज टँकमध्ये पडून बालकाचा मृत्यू

दुर्गापूर (चंद्रपूर) : दुर्गापूर वेकोलिच्या हद्दीत असलेल्या दुर्गापूर वाॅर्ड क्रमांक ४ येथील काही मुले खेळत असताना तेथील वेकोलिच्या सिव्हरेज टँकमध्ये पडून प्रेम वाघमारे या तेरा वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मृतकाच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळावी, याकरिता मुलाचा मृतदेह उपक्षेत्रीय प्रबंधकाच्या कार्यालयात ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दुर्गापूर वेकोलि वसाहतीलगत वेकोलिचे सांडपाण्याचे सिव्हरेज प्लांट आहे. यालगतच दुर्गापूर वार्ड क्रमांक ४ ची वस्ती आहे. येथील काही मुले मंगळवारी दुपारच्या वेळेस या प्लांटच्या आवारात खेळण्याकरिता आले होते. खेळत असताना यापैकी प्रेम वाघमारे या तेरा वर्षीय मुलाचा तोल जाऊन तो एका सिव्हरेज टँकमध्ये पडला. त्याच्यासोबत असलेल्या मुलांनी ही घटना वस्तीतील लोकांना सांगितली. नागरिकांनी तिकडे धाव घेत लगेच त्याला टँकमधून बाहेर काढले. मात्र तोपर्यंत प्रेमचा मृत्यू झाला होता. तो इयत्ता सातवीमध्ये शिकणारा विद्यार्थी होता.

नुकसानभरपाईसाठी मृतदेह वेकोलि कार्यालयात

वस्तीतील नागरिकांनी नुकसानभरपाईची मागणी करीत प्रेम वाघमारे याचा मृतदेह थेट वेकोलि दुर्गापूर उपक्षेत्रीय प्रबंधक यांच्या कार्यालयात आणून ठेवला. त्यामुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. वेळीच दुर्गापूर ठाण्यातील पोलिसांना पाचारण करण्यात आले. चर्चेतून मार्ग निघत नसल्याने वस्तीतील नागरिकांनी फ्रिजरची व्यवस्था करून त्याचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवला होता. रात्री साडे नऊ वाजता वेकोलि दुर्गापूरच्या व्यवस्थापनाच्या आश्वासनानंतर मृतदेह हलविण्यात आला.

Web Title: 13 year old by dies after falling into sewage tank of Durgapur Vekoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.