गडचांदूरचे ते १३० कुटुंब अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:20 AM2021-06-11T04:20:12+5:302021-06-11T04:20:12+5:30
कार्यादेशानंतरही विद्युत कनेक्शन देण्यास ‘महावितरण’ची टाळाटाळ गड़चांदूर : गडचांदूर येथे गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या बंगाली ...
कार्यादेशानंतरही विद्युत कनेक्शन देण्यास ‘महावितरण’ची टाळाटाळ
गड़चांदूर : गडचांदूर येथे गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या बंगाली कॅम्प परिसरातील १३० कुटुंबांना अद्याप विद्युत कनेक्शन मिळाले नाही. नागरिकांनी वारंवार मागणी केल्यानंतर विद्युत कनेक्शन देण्यासाठी सात लाख ६८ हजार ५७९ रुपयांचा शासकीय निधी मंजूर झाला. कार्यादेशदेखील देण्यात आला असून अजूनही ‘महावितरण’ने कामास सुरुवात केलेली दिसत नाही. विशेष म्हणजे अंधारात साप चावून अनेकांचा जीवदेखील गेला आहे. विद्युत कनेक्शन नसल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार संविधानाने बहाल केला आहे. विद्युत कनेक्शन मिळणे हा मूलभूत अधिकारांचा भाग आहे. नागरिकांनी आवश्यक सर्व दस्त, शुल्क आणि ऑनलाईन प्रक्रिया पार करूनदेखील महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे बंगाली कॅम्पचे कुटुंब अंधारात असून नागरिकांत रोष निर्माण झाला आहे.
सदर जागेवर बंगाली कॅम्पवासियांनी ४० वर्षांपासून अतिक्रमण केले असून महसुली अभिलेखानुसार ती जागा माणिकगड प्रशासनाची असल्याने अतिक्रमणधारकांना विद्युत कनेक्शन देऊ नये, असे पत्र महावितरण कंपनीला माणिकगड प्रशासनाने दिले आहे. माणिकगड कंपनी प्रशासनातील अधिकारी व ‘महावितरण’चे अधिकारी आपसी संगनमत करून नागरिकांना अंधारात ठेवत असल्याचा आरोप प्रहारचे माजी तालुकाध्यक्ष सतीश बिडकर यांनी केला आहे.
माणिकगड प्रशासनाने हरकत घेतली आहे. कामाच्या विलंबाचे नेमके कारण सांगता येणार नाही. चंद्रपूर येथील वरिष्ठ अधिकारी हे संपूर्ण चौकशीनंतर विद्युत कनेक्शन द्यायचे की नाही याबाबत निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया गडचांदूर येथील महावितरण अधिकारी इंदुरीकर यांनी दिली.