लोकअदालतीत ठेवली तब्बल १३ हजार प्रकरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2022 05:00 AM2022-03-13T05:00:00+5:302022-03-13T05:00:40+5:30
न्यायालयाच्या लढाईत आयुष्याचा बराच काळ निघून जातो, असे सांगून श्रीमती अग्रवाल म्हणाल्या, वेळ न घालवता प्रलंबित प्रकरणे आपसी तडजोडीने त्वरित निकाली काढण्यासाठी लोक अदालतीचे आयोजन करण्यात येते. पॅनल वर असलेल्या सर्व न्यायाधीशांनी त्यांच्याकडे असलेली जास्तीत जास्त प्रकरणे आज निकाली काढावीत. पक्षकाराचे न्यायालयीन प्रकरण निकाली निघाले तर त्याला मानसिक समाधान लाभते. शिवाय त्याचा वेळ आणि पैसासुद्धा वाचतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार यंदाची पहिलीच राष्ट्रीय लोकअदालत पार पडली. गत वर्षी तीन राष्ट्रीय लोकअदालतीमधून जिल्ह्यात सात हजार प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली होती, तर शनिवारच्या लोक अदालतीमध्ये १३ हजारांहून अधिक प्रकरणे ठेवण्यात आली आहेत.
‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेनुसार विधिसेवा प्राधिकरण आपल्यापर्यंत पोहोचत आहे. पक्षकारांनी लोक अदालतीच्या माध्यमातून आपली प्रलंबित प्रकरणे निकाली काढून आयुष्यातील महत्त्वाचा वेळ आणि पैसा वाचवावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी केले. जिल्हा न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतमध्ये अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर न्या. केदार, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव किरण जाधव, आदी उपस्थित होते. न्यायालयाच्या लढाईत आयुष्याचा बराच काळ निघून जातो, असे सांगून श्रीमती अग्रवाल म्हणाल्या, वेळ न घालवता प्रलंबित प्रकरणे आपसी तडजोडीने त्वरित निकाली काढण्यासाठी लोक अदालतीचे आयोजन करण्यात येते. पॅनल वर असलेल्या सर्व न्यायाधीशांनी त्यांच्याकडे असलेली जास्तीत जास्त प्रकरणे आज निकाली काढावीत. पक्षकाराचे न्यायालयीन प्रकरण निकाली निघाले तर त्याला मानसिक समाधान लाभते. शिवाय त्याचा वेळ आणि पैसासुद्धा वाचतो. असे त्या म्हणाल्या. विशेष म्हणजे जानबा पाटील आणि विजय शेंडे या पक्षकारांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विधिसेवा प्राधिकरणचे सचिव किरण जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी न्यायाधीश एस. एम. मौदेकर, के. पी. श्रीखंडे, एन. एन. बोदरकर, एम. एस. काळे, स्नेहा जाधव, ए. एन. माने, एन. एम. पंचारिया, आर. व्ही. मेटे यांच्यासह लॉ कॉलेजचे विद्यार्थी, उपस्थित होते.