सिंदेवाही वनपरिक्षेत्रात १ हजार ३१३ वन्यप्राणी
By admin | Published: May 28, 2016 01:04 AM2016-05-28T01:04:21+5:302016-05-28T01:04:21+5:30
दरवर्षीप्रमाणे यंदाही सिंदेवाही तालुका वनपरिक्षेत्रात बुद्ध पौर्णिमेला दोन दिवस वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली.
वाघ, बिबट, रानडुक्कर, चितळांची नोंद
सिंदेवाही : दरवर्षीप्रमाणे यंदाही सिंदेवाही तालुका वनपरिक्षेत्रात बुद्ध पौर्णिमेला दोन दिवस वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली. या दरम्यान अनेक प्रगणकांना वाघासह बिबट व अन्य प्राण्याचे दर्शन झाले.
तालुक्यातील सरडपार, ठकाबाई, (गडमौशी), भिवकुंड, सिंधबोडी, राजोली, डोंगरगाव, गुंजेवाही, टेकरी, कन्हाळगाव, पवनपार, खोद, वाघडोह, काळागोटा, उमा नदी दिवान, घोट, खैरी, मरेगाव, तांबेगडी, चिकमारा, खरकाडा, सिंदेवाही, चिकमारा, वनतलाव, आदी तलावावर २४ मचानी तयार करण्यात आल्या. एका मचाणीवर चार-पाच प्रगणक व त्यांच्यासोबत एक वनरक्षक होते. वनविभागाने मचानीवर बसून प्रगणना केली. यावेळी वाघ ७, बिबट १५, अस्वल २, चांदी अस्वल १, चितळ ११६, रानडुक्कर २६७, सांबर १२, नीलगाय ४५, भेडकी २१, रानगवे २४, मुंगूस १, रानकुत्रे १७, कोल्हा ६, ससे १६, व इतर प्राणी ७६५ मिळून १ हजार ३१३ वन्य प्राण्याची नोंद करण्यात आली. इतर वन्यप्राण्यामध्ये वानर, मोर, हरिण, घुबड, लांडोर, माकड, रानकोंबडे, रोही, निलघोडा, तडस यांचा समावेश आहे. वनविभागाने वनपरिक्षेत्रात २४ पाणवठे तयार करुन त्यात प्राण्यासाठी पाण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. मागील वर्षी सिंदेवाही वनपरिक्षेत्रात ८५० वन्यप्राणी होते. यावर्षी वन्यप्राण्याची संख्या १ हजार ३१३ झाली आहे.
सिंदेवाही वनपरिक्षेत्रात अधिक प्रमाणात जंगल आहे. अनेक गावे जंगलालगत आहेत. त्यामुळे जंगल वाचविण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरु आहेत. वन विभागाकडून जंगल लगतच्या गावामध्ये कुऱ्हाडबंदी, चराईबंदी आदी उपक्रम राबविल्याने वनातील झाडामध्ये वाढ होवून वन्यप्राण्याच्या शिकारीला आळा बसला आहे. पाणवठ्यावर वन्यप्राणी पाणी पिण्याकरिता येतात. अवैध शिकारीवर आळा बसण्याकरिता पाणवठ्यावर रात्रंदिवस वनमजूर व वन कर्मचारी यांना तैनात करण्यात आले असून पाणवठे व इतर ठिकाणी जिथे वन्यप्राणी येतात, त्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती वसंत कामडी यांनी दिली. (पालक प्रतिनिधी)