१३२१ तरुणांनी गाजवले मैदान; आता परीक्षेत लागणार कस
By परिमल डोहणे | Published: July 27, 2024 07:09 PM2024-07-27T19:09:11+5:302024-07-27T19:10:04+5:30
पोलिस शिपाईपदाकरिता आज लेखी परीक्षा : परीक्षा केंद्रात पेन, पॅड पोलिसच पुरवणार
चंद्रपूर : जिल्ह्यातील १३७ पोलिस शिपाईपदांकरिता मागील दीड महिने जिल्हा क्रीडा संकुल येथे मैदानी चाचणी पार पडली. यात १९ हजार ७६० उमेदवारांपैकी तब्बल एक हजार ३२१ उमेदवारांनी मैदान गाजवले आहे. या उमेदवारांची आज (दि. २८ जुलै रोजी) स्थानिक सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथे लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. मैदान गाजविलेल्या या उमेदवारांना परीक्षेत कौशल्य दाखवून मेरिट लिस्टमध्ये यावे लागणार आहे. तेव्हाच त्यांचे खाकी परिधान करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
चंद्रपूर जिल्हा पोलिस दलात पोलिस शिपाईच्या १३७ पदांसाठी तब्बल २२ हजार ५८३ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यात १३ हजार ४४३ पुरुष व ६ हजार ३१५ महिला व २ तृतीयपंथी उमेदवार तर बॅण्ड्समनच्या नऊ पदांकरिता दोन हजार १७६ पुरुष तर ६४६ महिला व १ तृतीयपंथी उमेदवारांनी अर्ज केले होते. १९ जूनपासून या भरतीच्या शारीरिक क्षमता चाचणीला जिल्हा क्रीडा संकुल येथे सुरुवात झाली होती. सुमारे दीड महिने पोलिस शिपाईपदाकरिता चाललेल्या शारीरिक क्षमता चाचणीत अर्ज केलेल्या तब्बल १९ हजार ७६० उमेदवारांपैकी एक हजार ३२१ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या उमेदवारांची आज (दि. २८ जुलै रोजी) स्थानिक सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथे लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिस विभागातर्फे परीक्षा केंद्राची पूर्ण तयारी झाली आहे. पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक रीना जनबंधू यांनी परीक्षा केंद्राची पाहणी केली आहे. परीक्षा केंद्रावर पहाटेपासूनच पोलिस बंदोबस्त तैनात राहणार आहे.
उमेदवारांनो, हे लक्षात ठेवा
- एकूण १०० गुणांच्या परीक्षेसाठी ९० मिनिटांचा कालावधी
- उमेदवारांना पेन, पॅड व पाण्याची बॉटल पुरवली जाणार आहे.
- परीक्षा केंद्रांत पेन, पॅड, लिखित साहित्य, मोबाइल, घड्याळ, स्मार्ट वॉच, हेडफोन, ब्लू-टूथ हेडफोन, कॅल्क्युलेटरसह अन्य कुठल्याही इलेक्ट्रॉनिक साहित्याला बंदी असेल.
- सदर उपकरण आढळून आल्यास भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल.
- मैदानी चाचणी व लेखी चाचणीचे प्रवेशपत्र, एक ओळखपत्राची मूळ प्रत, दोन फोटो बंधनकारक.
- परीक्षा केंद्रावर सकाळी ७ वाजतापासून उपस्थित राहावे.
अशी झाली मैदानी चाचणी...
पोलिस शिपाईपदाच्या १३७ जागांसाठी १९ हजार ७६० तर बॅण्डमनच्या ९ पदासाठी दोन हजार ८४३ अर्ज पोलिस शिपाई मैदानी चाचणी नऊ हजार १२३ पुरुष चार हजार ६७९ महिला आणि दोन तृतीयपंथींनी दिली. यापैकी ८७९ पुरुष व ४४० महिला व दोन तृतीयपंथी लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
"पोलिस भरती ही अत्यंत पारदर्शीपणे घेतली जात आहे. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर सकाळी ७ वाजता पोहोचावे. येताना मैदानी चाचणी परीक्षापत्र, लेखी परीक्षा प्रवेशपत्र, कोणत्याही एक ओळखपत्राची मूळ पत्र, दोन पासपोर्ट फोटो सोबत घेऊन यावे. पेन व पॅड आम्हीच पुरवू. मोबाइल, स्मार्ट वॉच, इअरफोन, हेडफोन, कॅल्क्युलेटर आदी सोबत आणल्यास प्रक्रियेतून बाद करण्यात येईल."
-मुम्मका सुदर्शन, पोलिस अधीक्षक, चंद्रपूर