चार वर्षांत वाहनधारकांना १.३४ कोटींचा दंड
By admin | Published: June 22, 2014 11:59 PM2014-06-22T23:59:08+5:302014-06-22T23:59:08+5:30
वाहतुकीचे नियम मोडून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत येथील वाहतूक नियंत्रण शाखेने वाहन मालकांकडून गेलय चार वर्षांत एक कोटी ३४ लाख ९५ हजार ५५० रुपयांचा दंड वसुल केला.
वाहतूक शाखेची कारवाई : पावणेदोन लाख प्रकरणे दाखल
संतोष कुंडकर - चंद्रपूर
वाहतुकीचे नियम मोडून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत येथील वाहतूक नियंत्रण शाखेने वाहन मालकांकडून गेलय चार वर्षांत एक कोटी ३४ लाख ९५ हजार ५५० रुपयांचा दंड वसुल केला. गत चार वर्षांत वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी एक लाख ८९ हजार ४५ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत.
प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळावे, कायद्याचे कठोर पालन करावे, असा संकेत असताना अनेकजण नियम मोडून वाहने चालवितात. त्यातून अपघातासारख्या दुर्दैवी घटना घडतात. हे अपघात टाळण्यासाठी वाहनधारकांनी शिस्त पाळावी, असा संकेत आहे. मात्र ही शिस्त मोडून वाहन चालविण्याचा प्रकार अलिकडे शहरात मोठ्या प्रमाणावर वाढीस लागला आहे. याविरुद्ध पोलिसांच्या वाहतूक शाखेने कारवाई केली. त्यात गेल्या चार वर्षांमध्ये एक लाख ८९ हजार ४५ केसेस दाखल करण्यात आल्या. तसेच संबंधित वाहन मालकांकडून एक कोटी ३४ लाख ९५ हजार रुपयांचा दंड वसुल केला.
सन २०११ मध्ये वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्या वाहतुकदारांविरुद्ध २१ हजार ५०६ प्रकरणे दाखल केली. त्या माध्यमातून त्यांच्याकडून ३० लाख ५१ हजार २०० रुपयांचा दंड वसुल केला. सन २०१२ मध्ये ३५ हजार ७६९ प्रकरणे दाखल करण्यात आलीत. त्या माध्यमातून ४३ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा दंड वाहतूक पोलिसांनी वसुल केला. सन २०१३ मध्ये ३५ हजार ७६९ प्रकरणे दाखल करण्यात आलीत. त्या माध्यमातून ४३ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. मे २०१४ पर्यंत वाहतूक पोलिसांनी १५ हजार ९०१ प्रकरणे दाखल केलीत. त्यामाध्यमातून १७ लाख ३७ हजार ३५० रुपयांचा दंड पोलिसांनी वसुल केला. यासोबतच १ जानेवारी ते ३० एप्रिलपर्यंत चंद्रपूरसहजिल्ह्यातील राजुरा, गडचांदूर, वरोरा, ब्रह्मपुरी, मूल या पोलीस ठाण्याअंतर्गत अवैध प्रवासी वाहतूक, जडवाहतूक व अन्य प्रकरणात २१ हजार ७३८ प्रकरणे दाखल करून वाहतूक पोलिसांनी ३६ लाख ४७ हजार ६५० रुपयांचा दंड वसुल केला. ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येईल, असे वाहतूक निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी सांगितले.