शासकीय रुग्णालयातील १३७ कामगार बेरोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:23 AM2017-12-21T00:23:53+5:302017-12-21T00:24:19+5:30
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या १३७ कंत्राटी कामगारांंना ११ डिसेंबरला अचानक कामावरुन कमी करण्यात आले. कामगारांचा मागील दोन महिन्यांचे वेतन थकीत आहे.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या १३७ कंत्राटी कामगारांंना ११ डिसेंबरला अचानक कामावरुन कमी करण्यात आले. कामगारांचा मागील दोन महिन्यांचे वेतन थकीत आहे. परिणामी, या कामगारांवर उपासमारीची वेळ आहे. त्यामुळे थकित वेतन देऊन कामावर पूर्ववत घेण्यासाठी चंद्रपूर जिल्हा सफाई व इतर कर्मचारी संघटनेचे संयोजक किशोर पोतनवार यांच्या मार्गदर्शनात शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना निवेदन दिले.
दरम्यान एप्रिलमध्ये कामगारांना कामावर घेण्याचे आश्वासन महाविद्यालयाचे अधिष्ठाता मोरे यांनी दिले असल्याची माहिती किशोर पोतनवार यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पोतनवार म्हणाले, जिल्हा सामान्य रुग्णालयात साई बहुउद्देशीय विकास संस्था, आधार स्वच्छता सहकारी संस्था, अवनी बहुउद्देशीय बेरोजगार सेवा सहकारी संस्था या तीन संस्थांना कंत्राट देण्यात आले होते. मात्र जिल्हा शल्य चिकित्सक यांनी ११ डिसेंबरला कंत्राट रद्द केले. त्यामुळे मागील ११ ते १२ वर्षांपासून कामावर असलेले कामगार बेरोजगार झाले आहे. यासंदर्भात कामगार शल्य चिकित्सकाला भेटले असता, त्यांनी महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना भेटण्याचे सांगितले. यावेळी कामगार अधिष्ठाताला भेटून कामावर घेण्याची मागणी केली, तेव्हा त्यांनी एप्रिलमध्ये नवे कंत्राट निघल्यानंतर कामावर पूर्ववत घेण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र तोपर्यंत कामगारांंना आर्थिक समस्या उद्भवणार आहे. त्यामुळे त्यांना त्वरीत कामावर घ्यावे, अशी मागणी केली. यावेळी संघटनेच्या अध्यक्ष शेवंता भालेराव, सचिव माया वाढरे, उपाध्यक्ष लता उईके उपस्थित होते.
वेतनामध्ये लूट
कामगारांनी महाविद्यालयाच्या अधिष्ठाताची भेट घेतली. तेव्हा शासन नियमानुसार कामगारांना आठ हजार ५०० रुपये वेतन देणे बंधनकार आहे, असे सांगितले. मात्र कंत्राटदार कामगारांना फक्त सहा हजार ५०० रुपये वेतन मागील अनेक वर्षांपासून देत आहे. त्यामुळे कामगारांची लूट होत आहे.