सुंदर गाव स्पर्धेत तालुक्यातील १४ ग्रामपंचायती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:29 AM2021-08-15T04:29:03+5:302021-08-15T04:29:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : शासनाने महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना सुरू केली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : शासनाने महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना सुरू केली आहे. या स्पर्धेत नागभीड तालुक्यातील १४ गावे आहेत. या गावांचे मूल्यांकन नुकतेच करण्यात आले.
गावे स्वच्छ व सुंदर व्हावीत, ग्रामपंचायतींच्या माध्यमातून लोकांना चांगल्या सवयी लागाव्यात या उद्देशाने शासन गेल्या अनेक वर्षांपासून विविध स्पर्धा राबवित आहे. या स्पर्धेत सहभाग नोंदवून अनेक गावांनी आपल्या गावांचा कायापालटही करून घेतला आहे. तालुक्यातील अनेक गाव शासनाकडून आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत भाग घेऊन पुरस्कारांचे मानकरीही ठरले आहेत. अशाच स्पर्धांपैकी ‘सुंदर गाव’ ही स्पर्धा आहे.
यावर्षी सुंदर गाव स्पर्धेत असलेल्या गावांमध्ये किरमिटी, कोटगाव, कन्हाळगाव, मेंढा, नवेगाव पांडव, पारडी ठवरे, वासाळा मेंढा, बाळापूर खुर्द, म्हसली, पांजरेपार, मिंडाळा, विलम मांगली आणि गोविंदपूर या गावांचा समावेश आहे.
स्पर्धेत विविध निकष ठेवण्यात आले आहेत. निकषांची पूर्तता करणाऱ्या ग्रामपंचायती बक्षीसास पात्र ठरणार आहेत. एका परीक्षण समितीने या गावांचे नुकतेच मूल्यमापन केले आहे. ही समिती आपला परीक्षण अहवाल संबंधित विभागास सादर करेल. या स्पर्धेत कोणती ग्रामपंचायत बाजी मारते याकडे आता या ग्रामपंचायतींचे लक्ष वेधले आहे.
स्पर्धेचे निकष
या स्पर्धेत असलेल्या गावांना वैयक्तिक शौचालय सुविधा व वापर, सार्वजनिक इमारतीमधील शौचालय सुविधा व वापर, पाणी गुणवत्ता तपासणी, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, पायाभूत सुविधांचा विकास, आरोग्य व शिक्षणविषयक सुविधा, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी, घरपट्टी, पाणीपट्टीची वसुली व वीज बिलांचा नियमित भरणा, प्लास्टिक वापरावर बंदी, मागासवर्ग, महिला, बालक आणि दिव्यांगांवर खर्च, लेखापरीक्षण पूर्तता, ग्रामसभांचे आयोजन, बचतगटांना प्रोत्साहन,सौर दिवे, बायोगॅस संयंत्राचा वापर, वृक्ष लागवड, जल संधारण, ग्रामपंचायतींच्या अभिलेख्यांचे संगणीकरण आदी विविध निकष ठेवण्यात आले आहेत.
140821\img-20210813-wa0044.jpg
गावाची तपासणी करतांना चमू