पगारातून १४०० कपात पीएफमध्ये सातशेचाच भरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:40 AM2020-12-14T04:40:06+5:302020-12-14T04:40:06+5:30
सावली : येथील नगरपंचायत अतंर्गत कंत्राटदारामार्फत सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पीएफसाठी १४०० रुपयांची कपात करण्यात येते. ...
सावली : येथील नगरपंचायत अतंर्गत कंत्राटदारामार्फत सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पीएफसाठी १४०० रुपयांची कपात करण्यात येते. मात्र प्रत्यक्षात पीएफमध्ये केवळ ७०० रुपयांचा भरणा करण्यात येतो, असा आरोप करीत येथील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी उलगुलान कामगार संघटनेच्या नेतृत्वात मागील तीन दिवसांपासून नगरपंचायत कार्यालयासमोर धरणा आंदोलन सुरु केले आहे.
सावली नगरपंचायतमार्फत घनकचरा व्यवस्थापन व नाली साफसफाईचे काम एका खासगी कंत्राटदाराला देण्यात आले आहे. हा कंत्राट २० सप्टेंबर रोजी संपुष्टात आला. मात्र कोरोनामुळे त्याच कंत्राटदाराला वाढीव ठेका देण्यात आला. या कंत्राटदरामार्फत सुमारे २० च्या जवळपास कर्मचारी काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पीएफच्या नावाखाली १४०० रुपये कपात करण्यात येते. मात्र प्रत्यक्षात पीएफमध्ये केवळ ७०० रुपयांचाच भरणा करण्यात येतो. तसेच त्यांना सुरक्षात्मक सोई सुविधा पुरविण्यात येत नाही. याबाबत अनेकदा कर्मचाऱ्यांनी आवाज उठवला. तसेच मुख्याधिकारी, तहसीलदार यांना निवेदन दिले. मात्र कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. याउलट कंत्राटदाराकडून त्यांना कामावरुन कमी करण्याची धमकी देण्यात येते. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी पीएफचे थकीत रुपयांचा भरणा करावा, किमान वेतन द्यावे, राष्ट्रीयकृत बॅंकेत वेतन जमा करावे, वेतन स्लीप देण्यात यावी, सफाई कामगारांना सेफ्टी शुज व अफरान द्यावे, पी.एफ नंबर द्यावा, साप्ताहिक सुट्टी देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी उलगुलान कामगार संघटनेच्या माध्यमातून नगरपंचायतीसमोर धरणा आंदोलन करीत आहे. या आंदोलनात संजय वसाके, बंडू मोहुर्ले, विकास सहारे, मयुर दुधे, गणेश मोहुर्ले, सुधीर लेनगुरे, विनोद निकुरे, चंद्रशेखर वसाके, समीर मोहुर्ले, सचिन मोहुर्ले, साईनाथ वसाके, अजय वसाके, भिकाजी निकुरे, फुलचंद थोरात, नत्थु थोरात, दयाळ खोब्रागडे, सोनी गणवीर, सरलाबाई थोरात, वंदना लांजेवार, माया जांभुळे आदी सहभागी झाले आहेत.
बॉक्स
शहरातील कचरासंकलन प्रभावीत
स्वच्छता कर्मचारी दररोज घरोघरी जावून कचरा संकलीत करीत होते. मात्र प्रलंबित मागण्यांसाठी स्वच्छता कर्मचारी मागील तीन दिवसांपासून धरणा आंदोलन करीत आहेत. त्यामुळे शहरातील कचरा संकलन बंद झाले आहे. त्यामुळे कचऱ्यांची विल्हेवाट लावण्याची मोठी अडचण जात आहे.