१४ व्या वित्त आयोगाच्या निधीत गैरव्यवहार

By admin | Published: April 15, 2017 12:44 AM2017-04-15T00:44:02+5:302017-04-15T00:44:02+5:30

तालुक्यातील घनोटी तुकूम येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच सचिवांनी १४ व्या वित्त आयोगाचा निधी मंजूर आराखड्यानुसार खर्च न करता इतर कामासाठी खर्च केला.

14th Finance Commission funding fraud | १४ व्या वित्त आयोगाच्या निधीत गैरव्यवहार

१४ व्या वित्त आयोगाच्या निधीत गैरव्यवहार

Next

अन्यत्र खर्च : घनोटी तुकूम येथील सरपंचांना कारणे दाखवा नोटीस
पोंभुर्णा : तालुक्यातील घनोटी तुकूम येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच सचिवांनी १४ व्या वित्त आयोगाचा निधी मंजूर आराखड्यानुसार खर्च न करता इतर कामासाठी खर्च केला. १८ डिसेंबर २०१६ ला पंचायत विस्तार अधिकारी यांनी ग्रामपंचायत घनोटी (तु.) येथे भेट देऊन ग्रामपंचायतीच्या दस्तऐवजाची पाहणी केली असता गंभीर स्वरुपाची वित्तीय अनियमितता व अफरातफर झाल्याचे दिसून आले. परिणामी संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडून सरपंचांना कारण ेदाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. मात्र सरपंचाकडून अद्यापही खुलासा प्राप्त न झाल्याने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीत अफरातफर झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी ग्रामपंचायत वर्तुळात आता खळबळ माजल्याचे दिसून येत आहे.
घनोटी तुकूम ग्रामपंचायतीमध्ये बऱ्याच दिवसांपासून १४ व्या वित्त आयोगाच्या निधीची परस्पर विल्हेवाट लावून इतरत्र निधी खर्च करण्यात येत होता. मात्र सदर प्रकार हा गुलदस्त्यातच होता. विस्तार अधिकारी सावसाकडे यांनी जेव्हा दस्तऐवजाची पाहणी केली तेव्हा गंभीर स्वरूपाची अफरातफर झाल्याचे दिसून आले.
विद्युत साहित्याचे थकीत बील भरणे, विद्युत साहित्य खरेदी करणे, ब्लिचींग पावडर खरेदी, नाल्यासफाई करणे इत्यादी कामावर विनाकारण एक लाख १६ हजार ३४५ रुपयांचा निधी खर्च केल्याचे दाखवून पैशाची सरपंचांनी विल्हेवाट लावली.
१४ व्या वित्त आयोगाच्या ४ नोव्हेंबर २०१५ च्या शसान निर्णयान्वये ग्रामपंचायतीने कोणत्या कामावर किती निधी खर्च करायला पाहिजे, याबाबत सूचना दिलल्या आहे. परंतु शासन निर्णयाकडे व ग्रामसभेने मंजूर केलेल्या आराखड्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन कामे केलेली असल्याने शासन निर्णयाचे स्पष्टपणे सरपंचांनी व सचिवांनी उल्लंघन केल्याचे स्पष्ट होते. इतर कामावर शासकीय निधीचा अपव्यय केल्याने १ लाख १६ हजार ३४५ रुपयाचा निधी वसूल करण्यात यावा का, याचाही खुलासा सरपंचांकडे मागीतला आहे. परंतु तो अजूनही मिळाला नाही.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रा.पं. घनोटी (तु.) यांना कुशल कामांची मुल्यांकनानुसार रक्कम ग्रा.पं.च्या खात्यामध्ये समाविष्ट करण्यात आली. कुशल कामाची तक्रार जिल्हा स्तरावर झाल्याने कुशल कामांचे पेमेंट साहित्य पुरवठाधारकास देण्यात येऊ नये, याबाबत विस्तार अधिकाऱ्यांकडून घनोटी ग्रामपंचायतीला कळविण्यात आले होते. परंतु तपासणीच्या वेळी धनादेश क्र. ४५८८५७ १ नोव्हेंबर २०१६ ला ५ लाख रुपयांची रक्कम उमरी पोतदार येथील मनोज ट्रेडर्स यांना देण्यात आलेले दस्तऐवजाची पाहणी ेकेली असता दिसून आले. पं.स. कार्यालयांकडून कुशल कामाचे पेमेंट देण्यात येऊ नये, असे लेखी पत्र घनोटी (तु.) ग्रामपंचायतीला दिलेले असतानाही सरपंच शामसुंदर मडावी यांनी साहित्य पुरवठाधारकास पाच लाख रुपये दिले आहे. परिणामी वरिष्ठांच्या आदेशाची जाणीवपूर्वक अवहेलना केली असून सचिव व सरपंचांनी कर्तव्यामध्ये कसूर केला आहे. विस्तार अधिकारी सावसाकडे यांनी ग्राम निधी व ग्राम पाणीपुरवठा फंडाचा दस्तऐवज तपासणीकरिता उपलब्ध करुन देण्यासाठी सांगितले. मात्र सदर दस्तऐवज ग्रा.पं. मध्ये नसल्याचे सरपंचांनी लिहून दिले. तसेच ग्रामपंचायतीमध्ये दस्तऐवज उपलब्ध करुन ठेवणे, ही सरपंचाची जबाबदारी असतानासुद्धा ते उपलब्ध करुन न ठेवणे ही गंभीर स्वरूपाची बाब आहे. विविध फंडाचे पासबुकही सरपंचांनी अद्ययावत केलेले नाही.
परिणामी आर्थिक बाबी संदर्भात विस्तार अधिकाऱ्यांना योग्य तपासणी करता आलेली नसल्याने घनोटी (तु.) ग्रामपंचायतीमध्ये बराच आर्थिक गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास येत आहे. संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडून सरपंच शामसुंदर मडावी व सचिव भोयर यांना नोटीस प्राप्त होताच तीन दिवसांच्या आत आवश्यक दस्तऐवाजासह लेखी खुलासा कार्यालयास सादर करावा, असे स्पष्ट लेखी आदेश असतानाही सरपंचांना खुलासा देण्यात टाळाटाळ केलेली आहे. यावरुन घनोटी (तु.) ग्रा.पं. मध्ये आर्थिक गैरप्रकार झाल्याचे दिसून येत आहे. याची चौकशी होणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)

प्रशासकीय कार्यवाहीसाठी सीईओकडे प्रस्ताव पाठविला आहे. आपण घनोटी (तु.) ग्रा.पं.च्या गैरकारभारासंदर्भात सरपंचाचा व ग्रामसेवकांच्या निलंबनाचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांना पाठविला आहे. त्यांच्या बैठकीत चर्चा करुन सरपंचांवर कारवाई केली जाईल.
- शशिकांत शिंदे, संवर्ग विकास अधिकारी पं.स. पोंभुर्णा

घनोटी (तु.) ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराबाबत विस्तार अधिकारी सावसाकडे यांच्याकडे विचारणा केली असता आपल्याकडे यासंदर्भात काहीच तक्रार आली नसल्याचे सांगून हात झटकण्याचा प्रयत्न केला.

Web Title: 14th Finance Commission funding fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.