१५ लाख ९३ हजार नागरिकांना मिळणार मोफत धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:11 AM2021-05-04T04:11:54+5:302021-05-04T04:11:54+5:30
चंद्रपूर : कोरोना संकटावर मात करण्यासाठी शासनाने यावर्षीही पुन्हा लाॅकडाऊनची घोषणा केली. यामुळे संपूर्ण व्यवसाय, बाजारपेठ बंद आहे. अशावेळी ...
चंद्रपूर : कोरोना संकटावर मात करण्यासाठी शासनाने यावर्षीही पुन्हा लाॅकडाऊनची घोषणा केली. यामुळे संपूर्ण व्यवसाय, बाजारपेठ बंद आहे. अशावेळी गरीब नागरिकांचे हाल होऊ नये, त्यांचे पोट भरावे यासाठी प्रथम राज्य सरकारने अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना धान्य मोफत वितरित करण्याची घोषणा केली. दरम्यान, आता पुन्हा प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तब्बल १५ लाख ९३ हजार ४४३ नागरिकांना मे तसेच जून महिन्याचे धान्य मोफत मिळणार आहे. यामुळे काही प्रमाणात का, होईना गरिबांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशावेळी गरिबांचे मोठे हाल होत आहे. अनेकांच्या हातचा रोजगार गेला आहे. त्यामुळे जगण्याचा प्रश्न आहे. अशावेळी त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी राज्य सरकारने प्राधान्य तसेच अंत्योदय कुटुंबतील सदस्यांना मे महिन्याचे धान्य मोफत देण्याची घोषणा केली. त्यानुसार लाभार्थ्यांना धान्य वितरित केले जात आहे. दरम्यान, आता प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गतही प्राधान्य तसेच अंत्योदय अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना प्रती लाभार्थी पाच किलो धान्य मोफत वितरित केले जाणार आहे. यामध्ये ३ किलो गहू तसेच २ किलो तांदळाचा समावेश आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदयचे ५ लाख १५ हजार ४७५ तर प्राधान्य गटातील १० लाख ७७ हजार ९६८ सदस्यांना ७ हजार ९६९ मेट्रिक टन धान्य वितरित करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासकीय स्तरावर धान्य वितरणाची प्रक्रिया सुरू झाली असून लाभार्थ्यांना मे आणि जून महिन्यामध्ये सदर धान्य मोफत मिळणार आहे.
बाॅक्स
एकूण लाभार्थी
१५,९३,४४३
अंत्योदय लाभार्थी
५,१५,४७५
प्राधान्य कुटुंब सदस्य
१०,७७,९६८
--
बाॅक्स
धान्य मे. टनमध्ये
गहू -४,७४२
तांदूळ - ३,२२७
एकूण- ७,९६९
बाॅक्स
काय मिळणार
३ किलो तांदूळ
२ किलो गहू (प्रती सदस्य)
कोट
अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना मे आणि जून या महिन्याकरिता प्रती सदस्य ५ किलो धान्य प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत वितरित करण्याबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त झाले आहे. रास्तभाव दुकानात सदर धान्य पोहोचते करण्याची कार्यवाही सुरू आहे. लाभार्थी नियमित धान्यासोबतच मोफतचे धान्य एकाच वेळी उचल करू शकतात. या महिन्यात नियमित धान्यसुद्धा राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे मोफत मिळणार आहे.
- भारत तुंबडे
अन्न पुरवठा निरीक्षण अधिकारी, चंद्रपूर
बाॅक्स
येथे करा तक्रार
अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील सदस्यांना मोफत धान्य मिळणार आहे. अशावेळी रास्त भाव दुकानदारांनी पैशाची मागणी केल्यास १८००२२४९५० या क्रमांकावर तक्रारही करता येणार आहे.