१५ हजार मंदिर, धर्मदाय संस्थांवर टाच
By admin | Published: November 18, 2016 12:55 AM2016-11-18T00:55:00+5:302016-11-18T00:55:00+5:30
जिल्ह्यातील १५ हजार मंदिर, चर्च, धर्मदाय संस्था, शैक्षणिक संस्था आदींना दररोज प्राप्त होणारे दान,
अनोंदणीकृत संस्थांनाही द्यावा लागेल हिशेब
चंद्रपूर : जिल्ह्यातील १५ हजार मंदिर, चर्च, धर्मदाय संस्था, शैक्षणिक संस्था आदींना दररोज प्राप्त होणारे दान, देणगी, वर्गणीचा हिशेब करून बँकेत जमा करण्याचे आदेश सहायक धर्मदाय आयुक्तांनी गुरूवारी दिले आहेत. या आदेशामुळे जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली आहे. ५०० व हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आले आहेत. नोटबंदीनंतर अतिरिक्त पैसा दान म्हणून मंदिरांच्या दानपेटीत टाकण्यात आल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. त्यामुळे मंदिरात देगणी देण्याऱ्यांची नोंददेखील ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यामध्ये धर्मदाय कायद्याच्या सेक्शन ‘ए’नुसार ८०० मंदिरांची सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी करण्यात आली आहे. सेक्शन ‘बी’नुसार जिल्ह्यात सुमारे ५० मशिदींची नोंदणी करण्यात आलेली आहे. सेक्शन ‘सी’नुसार, अंदाजे २५ चर्च नोंदणीकृत करण्यात आले आहेत. याशिवाय सेक्शन ‘एफ’नुसार, १४ हजार सामाजिक, शैक्षणिक संस्था नोंदणीकृत आहेत. या संस्थांना आवाहन करताना सहायक धर्मदाय आयुक्त रामचंद्र चव्हाण यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, धर्मदाय आयुक्तांच्या १६ नोव्हेंबर रोजीच्या परिपत्रकानुसार, महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अन्वये नोंदणी केलेली सर्व देवस्थाने, चर्च, मशिद, प्रार्थनास्थळे आणि धर्मदाय संस्था आदींनी दानपेटीत जमा झालेला निधी, दान, देणगी स्वरूपात प्राप्त होणाऱ्या चलनी नोटा आणि नाणी यांची दररोज बँकेत जमा करण्यात यावीत.
धर्मदाय आयुक्तांच्या आदेशामुळे देवस्थाने आणि सर्व धर्मदाय संस्थांसह नोंदणीकृत नसलेल्या मंदिरांच्या विश्वस्त मंडळामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. विधी व न्याय विभागाने १६ नोव्हेंबर रोजी हा आदेश जारी केला. त्यानुसार, धर्मदाय आयुक्त श. भा. साबळे यांनी राज्यातील सर्व सहायक धर्मदाय आयुक्तांना बँकेत दररोज चलनी नोटा व नाणी जमा करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारने ३१ डिसेंबर रोजीपर्यंत जुन्या ५०० व हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार, या जुन्या नोटा जमा करण्यासाठी बँकांपुढे रांगा लागल्या आहेत. त्याच वेळी गुरूवारी हे आदेश देण्यात आले आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत जुन्या ५०० व हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यात आल्या नाहीत, तर त्या नोटा चलनातून बाद ठरणार आहेत. (प्रतिनिधी)
नोंदणीकृत नसलेले हजारो मंदिरे
जिल्ह्यात नोंदणीकृत ८०० मंदिरे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याव्यतिरिक्त जिल्ह्यात सुमारे तीन हजार नोंदणीकृत नसलेली मंदिरे आहेत. त्यांचे विश्वस्त मंडळ असलेली तरी त्याचा हिशेब धर्मदाय आयुक्तांकडे सादर केला जात नाही. मात्र, गुरूवारी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, नोंदणीकृत नसलेल्या मंदिरांनाही बँकेमध्ये दररोज चलनी नोटा व नाणी जमा करायच्या आहेत. या नोंदणीकृत नसलेल्या मंदिरांनाही हा आदेश बंधनकारक असल्याचे सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले.
मशिदीचे अधिकार वक्फ बोर्डाकडे
जिल्ह्यात ५० मशिदी नोंदणीकृत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या मशिदी सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालय आणि वक्फ बोर्डाकडेही नोंदणीकृत करण्यात आलेल्या आहेत. सहायक धर्मदाय आयुक्तांनी मशिदींनाही चलनी नोटा व नाणी दररोज बँकेत जमा करण्याचे आदेश दिले असले तरी मशिदींचे नियंत्रण वक्फ बोर्डाच्या मार्गदर्शनात चालत असते. त्यामुळे हा आदेश त्यांना वक्फ बोर्डाकडून लागू पडेल.
फौजदारी व दंडात्मक कारवाई होणार
सहायक धर्मदाय आयुक्तांनी देणगी, दान, वर्गणीतून प्राप्त चलनी नोटा व नाणी दररोज बँकेत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशाचे उल्लंघन केल्याची बाब उघड झाल्यास संबंधित संस्थेविरोधात फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. सहायक धर्मदाय आयुक्तांना फौजदारी कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. फौजदारी कारवाईचा प्रस्ताव तयार करून तो जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे. याशिवाय दंडात्मक कारवाईसुद्धा करण्यात येणार आहे.
वर्गणी गोळा करण्यापूर्वी संस्था नोंदणीकृत करण्याचे आवाहन
जिल्ह्यात अनेक संस्था व मंदिरे सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणीकृत करण्यात आलेली नाहीत. नागरिकांकडून वर्गणी व दान स्वीकारताना या संस्था नोंदणीकृत करण्याचे आवाहन सहायक धर्मदाय आयुक्त चव्हाण यांनी केले आहे. वर्गणी गोळा करण्यासाठी सहायक धर्मदाय आयुक्तांची परवानगी आवश्यक आहे. देवास्थानदेखील नोंदणीकृत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.