१५० जणांना पोलीस ठाण्याची हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2017 12:34 AM2017-05-06T00:34:27+5:302017-05-06T00:34:27+5:30
स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धेत विदर्भातून पहिल्या आलेल्या चंद्रपूर महानगर पालिकेने कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीवर...
घंटागाडीवर ९० टक्के महिला : स्वच्छतेत विदर्भातून एकमेव महानगरपालिका
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धेत विदर्भातून पहिल्या आलेल्या चंद्रपूर महानगर पालिकेने कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीवर तब्बल ९० टक्के महिलांना रोजगार उपलब्ध केला आहे. राज्यात आघाडी मिळविण्यासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. तसेच उघड्यावर शौचास जाणाऱ्या तब्बल ५३५ जणाविरोधात कारवाई करण्यात आली. त्यापैकी घटनास्थळी सापडलेल्या १५० जणांना दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले होते.
स्वच्छ भारत अभियानात चंद्रपूर मनपाचे नाव चर्चेत आले आहे. आयुक्त संजय काकडे, उपायुक्त विजय देवळीकर, अभियंता हजार, संतोष गर्जेलवार आदी अधिकारी वर्गाच्या नेतृत्त्वात ही मोहीम राबविण्यात आली. देशातून ७६ वा व राज्यातून सहावा क्रमांक प्राप्त झाला आहे. या स्पर्धेत देशातील ७२६, तर राज्यातील ४४ शहरांनी भाग घेतला होता. ११, १२ व १३ जानेवारी २०१७ रोजी केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत तीन सदस्यीय समितीमार्फत आॅनलाईन स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा घेतलेली होती. यानंतर ७ फेब्रुवारीला पुन्हा एका सदस्यीय समितीने सर्वेक्षण केले. त्यामध्ये चंद्रपूरात मनपाने स्वच्छतेवर केलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
मनपाने गुड मॉर्निग पथकाचे गठन केले होते. हे पथक दररोज सकाळी शहरामध्ये फेरफटका मारत होते. यावेळी उघड्यावर शौचास जाणाऱ्या भागात भेट देऊन कारवाई करण्यात येत होती. या कारवाईमुळे शहराच्या स्वच्छतेत भर पडली आहे. या कारवाईमध्ये नागरिकांकडून तब्बल ३५ हजार रुपये दंड वसूल करणारी राज्यात एकमेव महानगरपालिका ठरली आहे. मनपाने स्वच्छतेवर विविध स्पर्धा घेतल्या. त्यापैकी अबुल कलाम आझाद बगिचाच्या संरक्षण भिंतीवर घेण्यात आलेली स्पर्धा सर्वांच्या चर्चेचा विषय होती. शहरातील ३५ सार्वजनिक शौचालयांचे सुशोभिकरण करण्यात आले आहे.
शौचालयाच्या जागेवर सुंदर बाग
शहरातील बालाजी वॉर्ड परिसरात एक सुलभ शौचालय होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. मनपाचे ते शौचालय भूईसपाट करून त्या जागेवर आता एक सुंदर अशी बाग निर्माण केली आहे. त्या बागेत मुलांसाठी खेळाचे साहित्य लावण्यात आले आहे. शहरातील प्रमुख बाग अबुल कलाम आजाद बगिचाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. तेथे ग्रीन जीम तयार करण्यात आली आहे. दुर्दशा झालेली बाग आता लोकांमुळे फुललेली असते. रामाळा तलावाचेही सुशोभिकरण करण्यात आले आहे. झरपट नदीच्या बंधाऱ्याजवळ बगिचा तयार करण्यात आला आहे.
६६९५ जणांना निधी उपलब्ध
मनपाचे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन दिले आहे. एका लाभार्थ्याला ७० हजार रुपयांचे टप्प्या-टप्प्याने देण्यात आले. सुमारे ६ हजार ६९५ लोकांना निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यातून ५ हजार ४७० शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे शौचासाठी उघड्यावर जाणाऱ्या नागरिकांच्या प्रमाणात घट झाली आहे.
१९८ घंटागाड्याने शहरातील कचरा संकलन
चंद्रपूर शहराय स्वच्छता राखण्याचे काम १९८ घंटागाड्यांच्या माध्यमातून दररोज केले जात आहे. या घंटागाड्या दररोज सकाळी वॉर्डात जाऊन लोकांकडून कचरा संकलन करतात. या घंटागाड्यांनी बचतगटाच्या महिलांना रोजगाराची संधी दिली आहे. १९८पैकी अंदाजे १८० महिलांना रोजगार देण्यात आला आहे. याशिवाय स्वच्छता कायम राहावी आणि लोकांनाही स्वच्छेतेची सवय लागावी, याकरिता २५ हजार नागरिकांना निळ्या व हिरव्या रंगाच्या कचरा कुंड्या देण्यात आल्या आहेत. जुनी मंदिरे, किल्ला आदींची सफाई करण्यात येत आहे.