१५० स्कूल बसचे परवाने रद्द होणार

By admin | Published: June 30, 2017 12:49 AM2017-06-30T00:49:02+5:302017-06-30T00:49:02+5:30

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसचा अपघात होऊ नये, यासाठी शाळा सुरु होण्यापूर्वी स्कूल बसची तपासणी करण्यात यावी,

150 school bus licenses can be canceled | १५० स्कूल बसचे परवाने रद्द होणार

१५० स्कूल बसचे परवाने रद्द होणार

Next

२०० वाहनांची तपासणी : नोटीस बजावूनही दखल नाही
परिमल डोहणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसचा अपघात होऊ नये, यासाठी शाळा सुरु होण्यापूर्वी स्कूल बसची तपासणी करण्यात यावी, असे उच्च न्यायालयाचे निर्देेश आहेत. मात्र जिल्ह्यातील ३५० पैकी केवळ २०० स्कूल बस वाहनांची तपासणी झाली आहे. उर्वरित १५० स्कूल बसच्या मालकांनी आपल्या वाहनाची तपासणी केलेली नाही. त्यामुळे १५० स्कूलबसचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत.
नुकतचे नवे शैक्षणिक सत्र सुरु झाले आहे. या सत्रात विद्यार्थ्यांना सुखरुप शाळेत नेण्यासाठी व शाळेतून घरी आणण्यासाठी स्कूल बसचा वापर करण्यात येतो. त्यामुळे वाहतूक नियम लक्षात ठेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालयातून स्कूल बस विशेष परवाने देण्यात येतात. त्यासाठी शाळा सुरु होण्यापूर्वी प्रादेशिक परिवहन विभागाकडून स्कूलबसची तपासणी करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. यावर विश्वास ठेऊन पालकवर्ग आपला पाल्य वेळेवर व सुरक्षीत शाळेत जावा, यासाठी पैसे खर्च करुन पाल्यांना स्कूलबसने शाळेत पाठवत असतो. मात्र शाळा सुरु होऊन दोन दिवसांचा कालावधी लोटला, तरी १५० स्कूल बस चालकांनी वाहनाची तपासणी केली नाही.
जिल्ह्यात एकूण ३५० स्कूलबस आहेत. त्या सर्व स्कूल बसच्या मालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयातून १७ एप्रिल रोजी वाहनाची तपासणी करण्यासंबंधीचे नोटीस देण्यात आले होते.
त्यानुसार वाहनाची तपासणी करणे अनिवार्य होते. मात्र २७ जुनपर्यंत २०० स्कूलबस चालकांनी तपासणी केली. उर्वरीत १५० स्कूल बस चालका व मालकांनी अद्यापही वाहनाची तपासणी केली नाही. ज्या स्कूल बसच्या मालकांनी आपल्या स्कूल बसची तपासणी केली नाही, अशांना प्रादेशिक परिवहन विभागातर्फे नोटीस बजावण्यात आले आहेत. त्यानंतरही स्कूल बस वाहनाची तपासणी केली नाही तर स्कूलबसचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत.

स्कूल बसमध्ये या सुविधा हव्या
स्कूलबस वाहनाचा रंग पिवळा असावा, स्कूल बसच्या मागे व पुढे स्कूलबस असे लिहलेले असावे, बसच्या दोन्ही बाजूला बहिर्वक्र भिंगाचे आरसे बसविले असावे, चालकाला बसच्या आतील भागातील सर्व दृष्य स्पष्ट दिसण्यासाठी मोठा आरसा असावा, स्कूलबसमध्ये प्रथमोचार पेटी असावी, अग्निशामक उपकरणे असावे, स्कूलबसमध्ये वेग नियंत्रक जोडले असावे, वाहनात ने-आण करणाऱ्या मुलांची यादी, निवसाचा पत्ता, दुरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमाक, रक्तगट, विद्यार्थ्याला उतरावयाचे ठिकाणी आदीची नोंद असलेली यादी असावी, स्कूलबसमध्ये बस चालकाव्यतिरीक्त एका सहवर्तीची तसेच ज्या स्कूल बसमध्ये मुलींची विद्यार्थिंनीची ने- आण करावी लागते अशा स्कूलबसमध्ये स्त्री सहवर्तीची नेमणूक असावी, वाहनचालकाला पाच वर्षे बस चालविण्याचा अनुभव तसेच स्कूल बस चालविण्याच्या सेवेत वैध असणारा बिल्ला असावा, तसेच आपत्कालीन परिस्थिीतीमध्ये सहजरित्या बाहेर पडण्याचे प्रशिक्षण वाहनचालक व त्याच्या सहवर्तीस दिलेले असावे या सुविधा असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाने शालेय विद्यार्थ्यांची सुरिक्षत वाहतूक होण्याच्या दृष्टीने विनिमय नियम २०११ लागू करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व नियमाचे पालन स्कूलबसच्या मालक व चालकांनी करणे गरजेचे आहे.

पालकांनी
सतर्कता बाळगावी
आपला पाल्य सुरक्षित व वेळेवर शाळेत जावा, यासाठी पालकवर्ग पैसे खर्च करुन स्कूल बस लावतात. मात्र अनेक स्कूलमध्ये आवश्यक असणाऱ्या सोईसुविधांचा अभाव आहे. अनेकदा स्कूल बसमध्ये विद्यार्थी कोंबून नेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे पालकांनी सतर्कता बाळगून ज्या स्कूल बसची तपासणी झाली तसेच आवश्यक सोई उपलब्ध आहेत, अशाच स्कूलबसमधून आपल्या पाल्यांना शाळेत पाठवावे.

विनातपासणी स्कूलबस चालविणे चुकीचे असून ही बाब कायद्याची अवहेलना करणारी आहे. रस्ते सुरक्षा निकषाचे पालण करणे गरजेचे आहे. त्यासाठी स्कूल बसची तपासणी करावी. ज्या स्कूलबस मालकांनी आपल्या वाहनाची तपासणी केली नाही, अशा स्कूलबसच्या मालकांना नोटीस देण्यात येईल. त्यानंतरही दखल न घेतल्यास त्याचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत, याची नोंद घ्यावी.
- विनय अहिरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर

Web Title: 150 school bus licenses can be canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.