पोषण आहार शिजविण्यासाठी १,५८७ शाळांना हवे गॅस कनेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:28 AM2021-04-08T04:28:56+5:302021-04-08T04:28:56+5:30
चंद्रपूर : शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यासाठी शासनाने शालेय पोषण आहाराची योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत शाळांमध्ये पोषण आहार ...
चंद्रपूर : शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यासाठी शासनाने शालेय पोषण आहाराची योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत शाळांमध्ये पोषण आहार शिजविला जातो. मात्र आजपर्यंत चुलीवरच अन्नधान्य शिजविले जात होते. आता मात्र शासन स्तरावर शाळांना गॅस सिलिंडर कनेक्शन देण्यासाठी प्रयत्न केले जात असून शाळांना यासंदर्भात सूचनाही मिळाल्या आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल १ हजार ५८७ शाळांना गॅस कनेक्शन मिळणार असून या शाळा धुरमुक्त होणार आहे.
जिल्ह्यात शालेय पोषण आहार योजनेंतर्गत २ हजार १८ शाळांना पोषण आहार पुरविल्या जातो. यामध्ये १ हजार ५८७ जिल्हा परिषद शाळा आहेत. सदर पोषण आहार शिजविण्यासाठी सरपण गोळा केले जात होते. त्यामुळे शाळा परिसरात धुराचे लोळ उडून शिक्षक तसचे विद्यार्थ्यांना यामुळे त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या शाळांना गॅस कनेक्शन देण्याची मागणी शिक्षकांकडून सातत्याने केली जात होती. दरम्यान, काही शाळांमध्ये शिक्षकांनी स्वत:कडील पैसा खर्च करून गॅस कनेक्शन घेतले असून या माध्यमातून अन्नधान्य शिजविणे सुरु होते. मात्र सदर कनेक्शनमुळे शिक्षक अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, आता शासनाने प्रत्येक शाळांना गॅस कनेक्शन देण्यासंदर्भात निर्णय घेतला असून शाळांना तशा सूचनाही दिल्या आहे. या अंतर्गत काही शाळांनी गॅस एजन्सीकडे अर्ज सुद्धा सादर केला आहे. त्यामुळे या शाळांना लवकरच गॅस कनेक्शन मिळणार असून शिक्षकांसह या शाळांतील तब्बल १ लाख ६५ हजार ४९६ विद्यार्थ्यांची धुरापासून मुक्तता होणार आहे.
बाॅक्स अशी आहे आकडेवारी
जिल्ह्यातील एकूण शाळा १,५८७
गॅस कनेक्शन नसलेल्या शाळा १,५८७
लाभार्थी विद्यार्थी १,६५,४९६
कोट
पोषण आहार योजनेंतर्गत जिल्ह्यातील शाळांना अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. मात्र अन्नधान्य शिजविण्यासाठी सद्यास्थितीत शाळांमध्ये गॅस कनेक्शन नाही. मात्र आता शाळांना गॅस कनेक्शन देण्यासंदर्भात शासनस्तरावर हालचाली सुरु झाल्या आहे. त्यामुळे शाळांना दिलासा मिळणार आहे.
-विशाल देशमुख
अधीक्षक, शालेय पोषण आहार, जि.प.चंद्रपूर